जळगावमध्ये महायुतीत वादाची ठिणगी…शिवसेना ठाकरे गटाने हवा दिल्याने उडाला भडका !
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपच्या जबाबदार पदाधिकाऱ्याचे उपोषण
जळगाव टुडे । विधानसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपलेली असताना, राज्याचे नेतृत्व आम्ही एक असल्याचे कितीही सांगत असले तरी जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडलीच आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाने त्यास आणखी हवा दिल्याने महायुतीत आगीचा भडका देखील उडाला आहे. आगीचे रूपांतर वणव्यात झाल्यास विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे त्यामुळे निर्माण झाली आहेत. ( Jalgaon News )
Jalgaon News
भाजपचे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे आणि त्यांच्या पत्नी माजी जि.प.सदस्या माधुरी अत्तरदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे अत्तरदे पती व पत्नी हे भाजपचे पदाधिकारी आहेत. तशात सत्ताधारी महायुतीच्या विरोधातील त्यांच्या त्या उपोषणाला जळगावमधील महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने जाहीर पाठींबा दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
प्रकरण नेमके आहे तरी काय ?
भुसावळ तालुक्यात शेतजमीन विकसित करण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेली असतानाही मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व परवानग्या रद्द केल्या. याच कारणावरून दुखावलेले भाजपचे जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे आणि त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे हे उपोषणाला बसले आहेत. त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविषयी तीव्र नाराजी देखील वक्त केली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ तसेच जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी भेट देऊन अत्तरदे पती-पत्नीच्या उपोषणाला जाहीर पाठींबा दिला. महायुतीच्या गोटातही त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.