Jalgaon News : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्व्हेत नाव पुढे असलेल्या इच्छुकांनाच विधानसभेचे तिकीट…!

Jalgaon News : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून अनेकजण इच्छुक आहेत. प्रत्यक्षात पक्षाने विविध माध्यमातून केलेल्या व्यापक सर्वेक्षणात नाव पुढे असलेल्या इच्छुकांनाच विधानसभेचे तिकीट मिळणार आहे. याशिवाय मतदारसंघनिहाय मेळावे घेऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेतली जातील आणि त्याचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे पाठविला जाईल, असे प्रतिपादन निरीक्षक भास्करराव काळे यांनी येथे केले.

Jalgaon News विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जळगावमधील आकाशवाणी चौकातील जिल्हा कार्यालयात गुरूवारी (ता.०५) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना श्री.काळे बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ. सतीश पाटील, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष छबुराव नागरे, जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, शहर अध्यक्ष मंगला पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी व शालीग्राम मालकर, जळगाव महानगराध्यक्ष एजाज मलीक व कार्याध्यक्ष ॲड.सचिन पाटील व संग्रामसिंह सूर्यवंशी, युवक अध्यक्ष रिकू चौधरी, डॉक्टर सेलचे विभागीय अध्यक्ष डॉ.नितीन पाटील, माजी आमदार अरूण पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, तिलोत्तमा पाटील, ज्योती पावरा आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या : माजी मंत्री गुलाबराव देवकर

आपले सरकार आता काही येत नाही, अशी भीती वाटू लागल्यामुळेच महायुतीने विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली आहे. लाडकी बहीण सारखी लाभाची खर्चिक योजना आणली आहे. या योजनेमुळे उलटपक्षी कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली असती तर त्यांना जास्त सहानुभूती मिळाली असती. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या ७२ हजार कोटींच्या कर्जमाफीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णतः कोरा झाला होता. दुर्दैवाने सध्याचे सरकार शेतकरी विरोधी असून, नुकसानग्रस्तांना मागील काळातील भरपाई अद्याप मिळालेली नाही. आताही अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले असताना, शासनाने पंचनामे करण्यासाठी पाऊले उचललेली नाही, अशी टीका माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केली.

इच्छुकांच्या संख्येवरून राष्ट्रवादीची ताकद वाढल्याची प्रचिती : माजी मंत्री डॉ.पाटील

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी इच्छा व्यक्त केली आहे. इच्छुकांच्या मोठ्या संख्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्याची प्रचिती येते. सर्व्हेनुसार राज्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. कदाचित पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होऊ शकतो, असे माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील म्हणाले. जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर वाय.एस.महाजन यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी छबुराव नागरे, एजाज मलीक, वंदना चौधरी, ॲड. रवींद्र पाटील, डॉ.बी.एस.पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. शिक्षक दिनानिमित्त पक्षाच्या शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button