Jalgaon News : जळगावमधील मेहरूण तलावावरील जलपर्यटन, सुशोभिकरणासाठी 35 कोटी रूपयांचा निधी…!
पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
Jalgaon News : महाराष्ट्रातील पहिला तीन दिवशीय “ॲक्वाफेस्ट” जल पर्यटन महोत्सव जळगावमध्ये मेहरूण तलावावर सध्या आयोजित केला आहे. यानिमित्त जळगाव शहरातील मेहरूण तलावावर जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी सुमारे 15 कोटी रुपये तसेच 20 कोटी रुपयांचा निधी तलावाच्या सुशोभिकरणासाठी मंजूर करण्यात आल्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
Jalgaon News: 15 crore rupees fund for permanent water tourism on Mehrun Lake!
यावेळी खासदार स्मिता वाघ, आ. सुरेश भोळे, आ. संजय सावकारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, एम.टी.डी.सी.चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांच्यासह अनेक अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, ॲक्वाफेस्ट” जल पर्यटन महोत्सवाची फीत कापून पहिल्यांदा बोटीतून खासदार, आमदार यांच्यासह जल पर्यटनाचा आनंद घेतला. बोट मध्यभागी गेल्यानंतर या बोटीतून स्पीड बोटीवर स्वार होऊन स्वतः हातात स्टेअरिंग हातात घेवून ताशी 90 किलोमीटर वेग असलेल्या बोटीचा थरार मंत्री गिरीश महाजन यांनी अनुभवला. मेहरूण तलावाला तीन फेऱ्या मारून स्वतः बरोबर बघणाऱ्यांनाही पर्यटन मंत्र्यांनी आनंद दिला.
जळगावकरांसाठी कायम स्वरूपी जल पर्यटन केंद्राची सोय
जळगाव जिल्ह्यात आणि जिल्ह्याला लागून देश विदेशातील पर्यटकांना आकर्षित करणारे अनेक पर्यटन स्थळ आहेत. जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळ विकसित केली जात असून आज पाण्यातला हा बोटींचा साहसी खेळ अनुभवल्यानंतर मेहरूण तलावात हे जल पर्यटन प्रकल्प कायम स्वरूपासाठी राबविणार असून यासाठी 15 कोटी रुपये देण्याचे निश्चित केले असून प्रशासकीय पातळीवरील तांत्रिक बाबी लवकर पूर्ण करून इथे जल पर्यटन सुरु केले जाईल, अशी घोषणा पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केली. तसेच 20 कोटी रुपयाचा निधी मेहरूण तलावाच्या चौपाटीसाठी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. फक्त जळगावकरांसाठीच नव्हे तर बाहेर जिल्ह्यातील पर्यटकांसाठीही हे आकर्षण केंद्र ठरेल, असा विश्वास देखील गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.