Jalgaon News : माजी खासदार उन्मेश पाटलांवर टीका करताना आमदार मंगेश चव्हाणांची जीभ घसरली..!
Jalgaon News : लोकसभेच्या निवडणुकीपासून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण आणि माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यात रंगलेला कलगी तुरा काही केल्या थांबण्याचे नावच घेत नाहीए. काही ना काही कारणावरून दोघांमधील शाब्दीक चकमकी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. आताही जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावरून दोन्हीजण एकमेकांच्या विरोधात भिडलेले असताना, गुरूवारी माजी खासदारांवर आरोप करताना आमदार चव्हाणांची जीभ घसरली. त्यामुळे मोठी खळबळ देखील उडाली.
Jalgaon News : MLA Mangesh Chavan’s tongue slips while criticizing former MP Unmesh Patil..!
माजी खासदार उन्मेश पाटील यांनी जळगाव दूध संघाच्या अनोगोंदी कारभारावर दोन दिवसांपूर्वीच ताशेरे ओढले होते. जळगाव दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडल्यानंतर दूध संघाचे चेअरमन असलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यामुळे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. मंगेश चव्हाण यांनी उन्मेश पाटील यांच्यावर टीका करताना त्यांना “पेपर फोडून पास होणारा पोरगा” असे संबोधले. चव्हाण म्हणाले की, पाटील कोणत्याही विषयाची माहिती घेऊन त्याचे श्रेय लाटण्याचे काम करतात. चव्हाणांनी पुढे सांगितले की, “माझ्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळाले,” असं सांगायलाही उन्मेश पाटील कमी करणार नाहीत.
आम्ही गायीच्या दुधात पैसे चोरणारी औलाद नाही…
आमदार चव्हाण म्हणाले की, गेल्या १० वर्षांमध्ये माजी खासदार पाटील यांनी ना गायींना पाहिलं, ना शेतकऱ्यांना आणि ना दुधाचं महत्व जाणलं. मात्र, आता दूध संघ आर्थिक अडचणीतून बाहेर पडल्यावर त्यांनी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या नावावर श्रेय घेण्याच्या या कृतीवर चव्हाणांनी पाटील यांच्यावर टीकेचा भडीमार केला. “उन्मेष पाटील यांना आमच्या चाळीसगाव मतदारसंघात कुत्रं सुद्धा विचारत नाही. गायीला आई मानण्याची आमची संस्कृती आहे आणि आम्ही आईच्या दुधात पैसे चोरणारी औलाद नाही,” असेही आमदार मंगेश चव्हाण म्हटले.
ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने आम्हाला शिकवू नये…
उन्मेश पाटील यांच्यावर निशाणा साधत आमदार चव्हाणांनी आरोप केला की, “पाटील यांनी गायीची भाड खाल्ली आहे. ज्याने गायीची भाड खाल्ली त्याने आम्हाला शिकवू नये. चाळीसगावला कत्तलखाना उभारण्यासाठी सर्व परवानग्या पाटील यांनीच दिल्या आहेत. यासाठी पाटील यांनी पैसे घेतल्याचे पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी सर्व काही आपण उघड करू,” असाही इशारा आमदार चव्हाण यांनी पाटील यांना दिला.