Jalgaon News : नेपाळ बस दुर्घटनेतील २५ मृतांवर शनिवारी रात्री उशिरा पार पडले अंत्यसंस्कार…!
Jalgaon News : नेपाळमधील तनहुँ जिल्ह्यातील मार्स्यांगडी नदीत शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांचे मृतदेह शनिवारी रात्री सव्वासात वाजता जळगावात दाखल झाले होते. विशेष विमानाने आणलेल्या या मृतदेहांची जिल्हा रुग्णालयात दोन तासांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर २५ शववाहिकांच्या माध्यमातून मृतदेह वरणगाव, सुसरी, पिंपळगाव खुर्द, गोळेगाव, तळवेल आणि आचेगाव या गावांकडे रवाना करण्यात आले. सर्व मृतांवर रात्री उशिरा ठिकठिकाणी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले.
Jalgaon News : Last rites of 25 deceased in Nepal bus accident were held late on Saturday night…!
नेपाळमधील बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे मृतदेह जळगावात आणण्यासाठी शनिवारी दिवसभर प्रयत्न सुरू होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यांनी आंतरराष्ट्रीय सेवेचे विमान जळगावात उतरवता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. या परिस्थितीला गांभीर्याने घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काठमांडूत भारतीय संरक्षण खात्याचे विमान उतरविण्यासाठी थेट संपर्क साधला. त्यांच्या निर्देशानुसार अखेर काठमांडूहून मृतदेह घेऊन निघणाऱ्या गृह मंत्रालयाच्या विमानाला जळगावात उतरविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामुळे सर्व २५ मृतदेह शनिवारी रात्री सातनंतर जळगावात दाखल झाले.
नेपाळहून मृतदेह घेऊन विमान दाखल झाले, तेव्हा जळगाव विमानतळावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार संजय सावकारे, मंगेश चव्हाण व विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.