Jalgaon News : माजी मंत्री गुलाबराव देवकरांचे पद्मालय साठवण तलाव, उपसा सिंचन योजनेसाठी राज्यपालांना साकडे…!

Jalgaon News : एरंडोल व धरणगाव तालुक्यातील सुमारे नऊ हजार हेक्टर कोरडवाहू शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची क्षमता असलेला पदमालय साठवण तलाव व उपसा सिंचन प्रकल्प अनेक वर्षांपासून पुरेशा निधीअभावी रखडला आहे. त्यास मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधीची तातडीने तरतूद करण्यात यावी, अशी मागणी जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्याकडे केली.

Jalgaon News : Former Minister Gulabrao Deokar’s Follow up on Padmalaya Reservoir and lift Irrigation Project to the Governor…!

गेल्या दोन दिवसांपासून जळगाव दौऱ्यावर असलेले राज्यपाल सी.पी.राधाकृष्ण यांनी जळगाव जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांशी विकासाच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यात जळगावचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे माजी कृषी व परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनीही सहभाग घेतला. यावेळी श्री.देवकर यांनी प्रामुख्याने अपूर्णावस्थेतील पद्मालय साठवण तलाव आणि उपसा सिंचन प्रकल्पाकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. राज्यपालांनीही त्याकडे लक्ष देण्याची ग्वाही दिली.

पद्मालय साठवण तलावामुळे ३३ गावांची शेती येऊ शकते ओलिताखाली

एरंडोल तालुक्यातील दौलतपुरा येथे पद्मालय साठवण तलाव व उपसा सिंचन प्रकल्प प्रस्तावित आहे. पावसाळ्याच्या दिवसात गिरणा नदीच्या पुराचे पाणी खाली तापी नदीला जाऊन मिळते. हे वाहुन जाणारे पाणी पद्मालय साठवण तलावात टाकून नंतर ते उपसा सिंचन योजनेद्वारे एरंडोल व धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याकरीता गिरणा नदीवरील दहिगाव येथे असलेल्या बंधाऱ्यातून पावसाळ्यातील पुराचे पाणी एमएस पाईपच्या रायझिंग मेनद्वारे उपसा करण्याचे प्रस्तावित देखील आहे. पद्मालय तलावाची पाणी साठवण क्षमता सुमारे ७०.३६ दशलक्ष घनमीटर आहे. या प्रकल्पातून नलिका व प्रवाही कालव्याद्वारे शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी पाणी देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे एरंडोल तालुक्यातील १६ गावांमधील ३५३३ हेक्टर तसेच धरणगाव तालुक्यातील १७ गावांमधील ५४६७ हेक्टर शेतीला त्याचा लाभ होऊ शकणार आहे.

या गावांना पद्मालय साठवण तलावाच्या पाण्याचा होऊ शकेल लाभ

पद्मालय साठवण तलाव व उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यानंतर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे एरंडोल तालुक्यातील नागदुली, खेडगांव, खडके बुद्रुक, पिंपळकोठा खुर्द, चोरटकी, वरखेडी तसेच धरणगाव तालुक्यातील पथराड खुर्द, पथराड बुद्रुक, शेरी या गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. याशिवाय गिरणा प्रवाही कालव्याद्वारे एरंडोल तालुक्यातील खर्ची बुद्रुक, रिंगणगाव, दापोरी, खेडी खुर्द, वैजनाथ, रवंजे, पिंपळकोठा प्रचा. सावदे प्रचा, कढोली, खर्ची खुर्द तसेच धरणगाव तालुक्यातील टाकळी बुद्रुक, टाकळी खुर्द, पाळधी बुद्रुक, पाळधी खुर्द, भोकनी, वंजारी, बांभोरी, एकलग्न, लाडली, धार, दोनगाव, फुलफाट, चांदसर या गावांची शेत जमीन ओलिताखाली येऊ शकणार आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button