Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रेशन दुकानांवरील आनंदाचा शिधा वाटपाचे काम थांबले…!
Jalgaon News : शासनाने गणेशोत्सवाच्या काळात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करणार असल्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने उशिराने आलेल्या आनंदाचा शिधा वाटपाला ब्रेक लागला असून, बहुतांश कीट तसेच वाटपाविना गोदांमामध्ये पडून आहेत. आता निवडणूक आटोपल्यानंतरच आनंदाचा शिधा वाटप होण्याची शक्यता असल्याने संबंधित शिधापत्रिकाधारकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
Jalgaon News : Due to election code of conduct in Jalgaon district, distribution of Ananda Shidha at ration shops stopped…!
गोरगरीबांना गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव, दिवाळी व इतर सण आनंदात साजरा करता यावेत, यासाठी राज्य सरकारने मागील दोन वर्षांपासून आनंदाचा शिधा वाटपाची योजना सुरू केली आहे. ज्या माध्यमातून एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, एक लिटर पाम तेल असा किराणा १०० रुपयांत देण्यात येत होता. यंदाही गौरी- गणपतीच्या सणाला १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता. परंतु, तितक्यात विधानसभा निवडणुकीची आचारंहिता लागू झाल्याने वस्तूंच्या पॉकेटवर नव्हे तर त्या वस्तू एकत्रितपणे ज्या पिशवीतून दिल्या जातात, त्यावर सत्ताधाऱ्यांचे फोटो असल्याने आनंदाचा शिधा वाटपात मोठी अडचण निर्माण झाली आहे. वाटपाविना पडून असलेला आनंदाचा शिधा आता निवडणूक होईपर्यंत गोदांमामध्येच सांभाळून ठेवावा लागणार आहे. गणेशोत्सवामध्ये आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर बाप्पाच्या आगमनापूर्वी हा शिधा मिळेल, अशी आशा सर्वसामान्यांना होती. परंतु गणेशोत्सव संपून जवळपास एक महिना उलटला तरी जिल्ह्यातील लाखो ग्राहकांपर्यंत आनंदाचा शिधाच पोहोचलेला नाही. साडी वाटप देखील थांबविण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात अपेक्षित असलेला आनंदाचा शिधा नवरात्रोत्सवात १० ऑक्टोबरला प्राप्त झाला. त्यानंतर चार-पाच दिवसातच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आम्हाला कीट वाटप थांबवावे लागले. आता वरून आदेश आला तरच आम्ही शिल्लक राहिलेले आनंदाच्या शिधाचे कीट वाटप करू. अंगठ्याचे ठसे घेतल्याशिवाय आम्हाला कोणतेच साहित्य वाटप करता येत नाही, असे एका रेशन दुकानदाराने सांगितले.