Jalgaon News : भाजप-शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधील हाणामारीने तापले जळगाव ग्रामीणचे राजकीय वातावरण…!

Jalgaon News : विधानसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजप आणि शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये थेट हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हाणामारीच्या प्रकरणामागे धरणगाव तालुक्यातील शैक्षणिक संस्था असली तरी, त्यामुळे महायुतीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापून निघाले आहे.

Jalgaon News : Clash between BJP-Shindesena officials heated up the political atmosphere of Jalgaon rural…!

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य पी.सी.आबा पाटील आणि शिंदे सेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी हे दोघे सोमवारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात गेले होते. यावेळी चावलखेडा (ता.धरणगाव) येथील नीळकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळातील शिक्षक भरतीवरून पाटील आणि चौधरी यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली. मुद्द्यावरून सुरू झालेला वाद गुद्द्यांवर येऊन हाणामारीत रूपांतरीत झाला. दोघांच्या भांडणात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातील खुर्च्यांची तोडफोड झाली तसेच टीव्हीचे नुकसान झाले. पी.सी.आबा पाटील व गोपाल चौधरी यांच्यातील हाणामारीच्या घटनेने शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातील अधिकारी व कर्मचारी देखील कमालीचे भयभीत झाले.

दरम्यान, पी.सी.आबा पाटील यांनी म्हटले आहे की नीळकंठेश्वर शिक्षण संस्थेच्या झुरखेडा येथील शाळेत शिक्षकांच्या काही जागा रिक्त असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांकडे त्यासंदर्भात बोलण्यासाठी गेलो होतो. तेव्हा त्याठिकाणी गोपाल चौधरी हे देखील उपस्थित होते. मी शिक्षक भरती संदर्भात बोलत असताना, चौधरी यांनी कोणताच संबंध नसताना शिक्षण संस्थेतील पदभरती बाबत माझ्याशी हुज्जत घातली. वाद घालून भ्रष्टाचाराचा आरोप देखील केला. त्यानंतर धक्काबुक्की झाली. सामाजिक विषय असल्याने याबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही.

दुसरीकडे गोपाल चौधरी यांनीही म्हटले आहे की, शिक्षणाधिकाऱ्यांकडे वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. त्याठिकाणी पी.सी.पाटील नंतर आले. त्यांच्या शिक्षण संस्थेतील बोगस कारभाराबाबत शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करत असतानाच पाटील यांनी मला शिवीगाळ केली तसेच वाद घालून मारहाण केली. सामाजिक विषय असल्याने याबाबत पोलिसात तक्रार दिलेली नाही.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button