जळगावच्या आजी-माजी मंत्र्यांनी नवरदेवासोबत बग्गीवर चढून केले फोटो सेशन…!

जळगाव टुडे । राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे नेहमीच म्हटले जाते. प्रत्यक्षात लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्याने सगळीकडे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. विरोधक आता एकमेकांना पाण्यात पाहु लागले आहेत. त्याची प्रचिती जळगाव जिल्ह्यातही येत असताना, दोन विरोधी पक्षाच्या आजी-माजी मंत्र्यांनी एका विवाह सोहळ्यात थेट बग्गीवर चढून नवरदेवासोबत फोटो सेशन करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ( Jalgaon News )

जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी चाळीसगाव, पाचोरा, एरंडोल, चोपडा, भुसावळ, जामनेर, जळगाव शहर व जळगाव ग्रामीण, अमळनेर, मुक्ताईनगर या १० मतदारसंघात सध्याच्या घडीला महायुतीचे आमदार आहेत. फक्त रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीचे एकमेव आमदार आहेत. अशा या परिस्थितीतच आता विधानसभेची आगामी निवडणूक महायुती व महाविकास आघाडी लढणार आहे. दरम्यान, शिवसेनेत व राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही विरोधी आघाड्या लवकरच आमनेसामने येणार आहेत. एकमेकांची ताकद आजमावण्यासाठी सज्ज झालेले राजकीय पक्ष विधानसभेच्या निवडणुकीत विजय आमचाच असल्याचे दावे सुद्धा आतापासून करू लागले आहेत. काहींनी तर मतदारांची मने जिंकण्यासाठी त्यांना थेट पंढरपूर वारी घडवून आणण्याचा आटापिटा सुरू केल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागल्यानंतर दोन किंवा त्यापेक्षा जास्त राजकीय पक्ष आता एकमेकांच्या चुका दाखवण्यात धन्यता मानत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये मतदारसंघाची कशी पिछेहाट झाली, त्याकडेही बोट दाखवले जात आहे. एकमेकांचे उणेदुणे काढण्यातच धन्यता मानली जात आहे. अशा या परिस्थितीत सर्वांना सुखद धक्का देणारा प्रसंग जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे घडला. विवाह सोहळ्याचे निमंत्रण असल्याने भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच नवनिर्वाचित खासदार स्मिता वाघ, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आदींनी तिथे हजेरी लावली होती. प्रसंगी नवरदेवासोबत थेट घोडा बग्गीवर चढून फोटो काढण्याचा मोह आजी-माजी मंत्र्यांना आवरला नाही. आपसातील मतभेद विसरून एकत्र आलेले राजकारणी पाहून विवाह सोहळ्यास उपस्थित वऱ्हाडी मंडळींनाही आनंद झाला. यावेळी हास्याची लकेर सुद्धा पसरली. घडल्या प्रकाराची नंतर बराचवेळ चर्चा चालली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button