फळ पीकविम्यात अन्याय…यावल तालुक्याच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !
जळगाव टुडे । हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेअंतर्गत अति तापमानाच्या निकषात चोपडा आणि रावेर तालुक्यांचा समावेश झाला आहे. मात्र, यावल तालुक्यास मुद्दाम डावलले गेले आहे. अति तापमानाच्या निकषात बसणाऱ्या संबंधित सर्व मंडळाचा फळ पीकविमा योजनेत समावेश करण्याच्या मागणीसाठी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन दिले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे ऐकून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. ( Jalgaon News )
राज्यभरात यावर्षीच्या उन्हाळ्यात कमाल तापमानाने उच्चांक गाठलेला असताना, जळगाव जिल्ह्यातील अनेक महसुली मंडळांमध्ये ४५ अंश सेल्सिअसचे पेक्षा जास्त तापमान होते. फळ पीकविमा योजनेच्या निकषानुसार जळगाव जिल्ह्यात एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीतर्फे मे महिन्यातील नुकसानीपोटी सुमारे ४३,५०० रुपयांप्रमाणे भरपाई त्यामुळे जाहीर करण्यात आली आहे. त्यात शेजारच्या रावेर तालुक्यातील ०७ महसुली मंडळे आणि चोपडा तालुक्यातील ०६ महसुली मंडळांचा समावेश केला आहे. मात्र, यावल तालुक्यातील एक सुद्धा मंडळ नुकसानग्रस्त मंडळांच्या यादीत समाविष्ट न झाल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे.
दरम्यान, जिल्हाभरात उच्चांकी तापमानाची नोंद घेतली गेलेली असताना यावल तालुक्यातील फैजपूर, भालोद, बामणोद, किनगाव, साकळी या मंडळातील एकही गावाचा त्यात समावेश न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची लाट पसरली आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा कृषी अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धनंजय शिरीष चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधार शेठ चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर बऱ्हाटे, सतीश पाटील, केतन किरंगे, भूषण भोळे, मारुळचे सरपंच असद अहमद, भुपेश जाधव, समीर तडवी, नीलेश बाक्षे, टेनू सोनार आदी उपस्थित होते.