जळगावमध्ये पोलिसाने जीवाची बाजी लावली…रेल्वेखाली पडलेल्या मुलीचे वाचवले प्राण !

जळगाव टुडे । शहरातील रेल्वे स्थानकावर एक महिला प्रवाशी लहान बाळासह दोन वर्षीय मुलीला घेऊन सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये चढत होती. दरम्यान, घाईघाईत रेल्वेत चढत असतानाच अचानक चिमुकलीचा हात निसटला आणि ती थेट रेल्वे रुळावर जाऊ पडली. सुदैवाने घडलेला प्रसंग लक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या एका पोलिसाने जीवाची बाजी लावून रेल्वेखाली पडलेल्या त्या मुलीचे प्राण वाचवले. ( Jalgaon News )

जळगावच्या औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यातील कर्मचारी फिरोज तडवी यांनी जीवाची बाजी लावून एका चिमुकलीचा जीव वाचवल्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फिरोज तडवी यांचे रेल्वेस्थानकावर उपस्थित असलेले प्रवाशी, नागरिकांनी देखील टाळ्या वाजवून कौतुक केले. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, पोलीस उपअधिक्षक सुनील कुराडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी देखील फोनवरून फिरोज तडवी यांना शाबासकी दिली.

चिमुकली खाली पडणे आणि रेल्वेला हिरवा सिग्नल मिळण्याची वेळ एकच झाली होती. मात्र, पोलीस कर्मचारी फिरोज तडवी यांनी क्षणाचाही विलंब न करता रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. दोन्ही हाताने रूळावर पडलेल्या चिमुकलीला बाहेर काढले. घटनेची माहिती कळताच रेल्वे पोलिसांनी स्थानकावर धाव घेतली आणि महिलेला आपल्या दालनात बसविले. पोलिस कर्मचारी तडवी हे शासकीय कामानिमित्त नाशिक येथे जात होते. त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतूक केले जात असून, चिमुकलीला त्यांच्यामुळेच जीवदान मिळाले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button