जळगावच्या पोलिस भरतीत पहिल्या दोन दिवसातच ६१५ उमेदवारांची दांडी !
जळगाव टुडे । जळगाव जिल्हा पोलीस घटकांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरतीसाठी शारीरिक चाचणी प्रक्रिया बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, अति उत्साहात अर्ज करणारे उमेदवार प्रत्यक्ष भरतीसाठी मात्र मोठ्या संख्येने अनुपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्राप्त माहितीनुसार, पहिल्या दोन दिवसातच सुमारे ६१५ उमेदवारांनी पोलिस भरतीला दांडी मारली आहे. जळगाव जिल्ह्यातील पोलिस शिपाई पदाच्या १३७ जागांसाठी ही भरती होत आहे. ( Jalgaon News )
जळगाव येथील आयोजित पोलिस भरतीसाठी पहिल्या दिवशी बुधवारी (ता.१९) सुमारे ५०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते. प्रत्यक्षात मैदानी चाचणीसाठी फक्त २९६ उमेदवार हजर राहिले, त्यातही छाती आणि उंचीमध्ये २३७ उमेदवार पात्र ठरले. आज गुरूवारी (ता.२०) देखील सुमारे १००० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. प्रत्यक्षात फक्त ६८१ उमेदवार उपस्थित राहिले आणि छाती व उंचीच्या मोजणीत त्यापैकी ६०९ उमेदवार पात्र ठरले.
दरम्यान, पोलिस भरतीत सहभागी झालेल्या उमेदवारांकडून १०० मीटर तसेच १६०० मीटर धावणे, गोळाफेक यांची चाचणी करुन घेतली जात आहे. कोण किती वेळात किती धावले, याच्या अचूक नोंदणीसाठी संबंधित उमेदवारांच्या पायावर चीप लावण्यात येत आहे. या भरतीत सहभागी झालेले अनेक उमेदवार हे पदवीधर तसेच इंजिनिअर सुद्धा असल्याची माहिती मिळाली आहे.