चोपडा शहरातील नूतन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन

Jalgaon News : जिल्ह्यातील चोपडा शहरात अत्याधुनिक अशी प्रशासकीय इमारत बांधल्यामुळे महसुली कामांना आता गती येईल. नव्या इमारतीत नवी कार्यसंस्कृती रुजवा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनीही तालुका प्रशासनाला नव्या इमारतीसाठी शुभेच्छा दिल्या.

चोपडा तहसील कार्यालयाच्या नविन प्रशासकीय इमारतीचे इमारतीचे उदघाट्न पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते झाले. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, माजी आमदार श्रीमती लताताई चंद्रकात सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे उपस्थित होते. नूतन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला.

पोटखराब क्षेत्र वहिती लायक क्षेत्रात रूपांतर करण्याअंतर्गत प्रातिनिधीक स्वरुपात मौजे शेंदणी येथील हसरत झगा ढीवर यांना पोटखराब क्षेत्र वहिती लायक करण्यात आल्याबाबत ७/१२ उतारा व फेरफार नोंदीचे वाटप पालकमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्पासाठी विज वितरण कंपनीला भाडेपट्टयाने जमीन उपलब्ध करून देण्यात आली. तशी नोंद घेतलेला उतारा उपअभियंता, चोपडा ग्रामीण वीज वितरण कंपनी यांना देण्यात आला. वनविभागाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ७/१२ संगणकीकरण अंतर्गत ई चावडी योजना अंमलबजावणी सुरु केली असून, आज प्रातिनिधीक स्वरूपात अरूण माधवराव पाटील रा. वराड यांनी भोगवटदार वर्ग-२ जमीन भोगवटदार वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्याकामी अनर्जित रक्कम रूपये २५,६७८५०/- सरकार जमा केल्याबाबतची ऑनलाईन पावती देण्यात आली.

आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह बांधकामासाठी महसूल विभागांतर्गत चोपडा शिवारातील शासकीय जमिन उपलब्ध करुन देण्यात आल्याचा ७/१२ उतारा व फेरफार पत्रक सहायक प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांना देण्यात आले. यावेळी अनेक लाभार्थीना विविध लाभाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये आदीवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्यामार्फत वनहक्क कायदा अमंलबजावणी वैयक्तिक लाभार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते वनपट्टे देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चोपडयाचे उपविभागीय अधिकारी एकनाथ बंगाळे यांनी केले. चोपडयाचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button