जळगाव शहर व परिसरात आज शनिवारी (ता.15) पुन्हा पावसाची तासभर हजेरी !
जळगाव टुडे । मॉन्सूनची संपूर्ण राज्यभरात चाल मंदावलेली असताना, जळगाव शहर व परिसरात आज शनिवारी (ता.15) दुपारी पुन्हा तासभर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, खरिपाच्या पेरण्यांना आता चांगला वेग येणार असल्याचे सांगितले जात आहे. काही शेतकऱ्यांनी पहिल्या पावसानंतरच पेरणीची घाई केली होती, त्यांचीही पिके आताच्या या पावसामुळे तरारणार आहेत. ( Jalgaon News )
यंदाच्या पावसाळ्यात अरबी समुद्रावरील प्रवास अधिक वेगाने झाल्याने मॉन्सून केरळ राज्यात दोन दिवस आधीच दाखल झाला होता. त्यानंतर त्याने महाराष्ट्रापर्यंत मजल मारून बऱ्याच जिल्ह्यात हजेरी देखील लावली होती. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मात्र मॉन्सूनची वाटचाल काहीशी थांबली आहे. अनेक भागात पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी पेरणीसाठी आभाळाकडे डोळे लावून बसले आहे. खान्देशातही वेगळी परिस्थिती नसून, कुठे पाऊस पडत आहे तर कुठे पाण्याचा थेंब नाही. जळगाव शहर व परिसरात मात्र आठवडाभरात तीनवेळा चांगला पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यात अद्याप पावसाची वाट पाहिली जात आहे. पुरेशा पावसाअभावी शेतीशिवारातील नाले अजुनही खळाळताना दिसलेले नाहीत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, आज शनिवारी (ता.15) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला होता. प्रत्यक्षात पावसाने अनेक भागात फक्त वाट पाहायला लावली. आकाशात ढगांची गर्दी तेवढी जमा झाली. पाऊस पडलाच नाही.