मंत्री गिरीश महाजनांनी गमावले, त्यापेक्षा जास्त एकनाथ खडसेंनी कमावले !
जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीनंतर जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ झाली आहे. सांगायला जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या असल्या तरी, त्याचा प्रत्यक्ष फायदा भाजपच्या स्थानिक नेत्यांना अजिबात झालेला नाही. मात्र, कुंपणावर थांबत लांबून शेत राखणाऱ्या बाहेरच्या काही राजकारण्यांना त्याचा जबरदस्त फायदा झाल्याचे बोलले जात आहे. त्याचीच चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे आणि ती भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी देखील लागली आहे. ( Jalgaon News )
लोकसभेच्या अतिशय चुरशीत पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला उत्तर महाराष्ट्रात मोठा फटका बसला असून, त्यांच्या आठपैकी फक्त दोनच जागा निवडून आल्या आहेत. जळगाव आणि रावेर वगळता कुठेच भाजपचे नामोनिशाण शिल्लक राहिलेले नाही. त्याचे खापर अर्थातच भाजप नेते संकटमोचक गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांच्या डोक्यावर फोडले जात आहे. कारण, पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावरच त्या आठही जागांची जबाबदारी टाकली होती. प्रत्यक्षात जळगाव आणि रावेर वगळता तब्बल सहा जागांवर महायुतीला पाणी सोडावे लागले आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार झटका देण्यात उत्तर महाराष्ट्राचाही मोठा वाटा राहिला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अर्थातच राज्यातील क्रमांक दोनचे मंत्री असलेले गिरीश महाजन यांचे भाजपमधील पर्यायाने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील वजन आता कमी होण्याचे संकेत मिळाले आहेत.
एकनाथ खडसेंचे ‘चित भी मेरी पट भी मेरी…’
लोकसभेच्या निकालावर अनेकांचे राजकीय भवितव्य हे अवलंबून असताना, विशेषतः एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांच्यावर अनेकांचे लक्ष केंद्रीत झाले होते. सून रक्षा खडसे यांच्यासाठी त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती, हे खरे असले तरी रावेरमधून रक्षा खडसे जिंकल्या किंवा पराभूत झाल्या तरी सासरेबुवा एकनाथ खडसे हे फायद्यातच राहणार असल्याचे वृत्त ‘जळगाव टुडे’ न्यूज पोर्टलने निकालापूर्वी प्रकाशित केले होते. ते वृत्त अगदी तंतोतंत खरे ठरल्याची प्रचिती निकालानंतर आली असून, रक्षा खडसे रावेरमधून तिसऱ्यांदा विजयी तर झाल्याच आहेत. शिवाय त्या आता केंद्रातही राज्यमंत्री बनल्याने वैयक्तिक एकनाथ खडसे हे त्यामुळे खूप फायद्यात राहिले आहेत. कारण, भाजपमध्ये प्रवेश होण्याआधीच त्यांचे राज्याच्या तसेच जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील पूर्वीचे ते भरभराटीचे दिवस पुन्हा वापस आले आहेत. ‘चित भी मेरी पट भी मेरी…’ म्हणत त्यांनी गिरीश महाजन तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कट्टर विरोधकांनाही धोबीपछाड दिल्याचे बोलले जात आहे. आता एकनाथ खडसे हे कोणाचेच काही ऐकणार नाहीत आणि ते स्वतः एखाद्या राज्याचे राज्यपाल पद मिळवून, दुसरीकडे कन्या रोहिणी खडसे यांना शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून मुक्ताईनगरची आमदारकी मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असेच दिसते आहे.