जळगाव ते ममुराबाद रस्त्यावर वाघुरच्या जलवाहिनीमुळे पडला मोठा जीवघेणा खड्डा !
जळगाव टुडे । वाघुर प्रकल्पाच्या जलवाहिनीसाठी राज्यमार्गाच्या मध्यभागी खोदलेला खड्डा पावसाळामुळे आणखी खचल्याने जळगाव ते ममुराबाद दरम्यानची वाहतूक आज गुरूवारी (ता.13) मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक भरधाव वाहने त्याठिकाणी जाऊन आदळली. अनेक वाहने नादुरूस्त देखील झाली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित ठेकेदाराने तिकडे दिवसभर ढुंकुनही पाहिले नाही. (Jalgaon News)
वाघूर धरणाचे पाणी ममुराबाद व परिसरात आणण्यासाठी मोठमोठ्या जलवाहिन्या टाकण्याचे काम उन्हाळ्याच्या दिवसात ठेकेदार कंपनीने केले. त्यासाठी काही ठिकाणी जळगावहून ममुराबाद मार्गे यावल-चोपडा जाणाऱ्या रहदारीच्या रस्त्याचे खोदकाम देखील करण्यात आले. प्रत्यक्षात पाईप टाकल्यानंतर खोदलेल्या खड्ड्यात व्यवस्थित माती, मुरूम व खडीचा भराव टाकण्याची काळजी ठेकेदाराने घेतली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागानेही त्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी, पहिल्याच पावसात रस्त्याच्या मध्यभागी खोदलेल्या खड्ड्यातील थातुरमातूर भराव आता खचला आहे. अवजड वाहनांमुळे खड्ड्याची ती अवस्था झालेली असताना, पावसाचे पाणी साचल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने अनेक भरधाव वाहने आता त्यात जाऊन पडत आहेत. अनेक वाहनांचे मोठे नुकसान सुद्धा त्यामुळे झाल्याचे सांगितले जात आहे. त्याबद्दल दुचाकी व चारचाकी वाहनधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.