असोद्याचा शेतकरी रेल्वे बोगद्याखाली साचलेल्या पाण्यात बुडाल्याने मृत्युमुखी !
जळगाव टुडे | शहर व परिसरात बऱ्याच ठिकाणी सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रेल्वे बोगद्याखाली साचलेल्या पाण्यात असोदा (ता.जळगाव) येथील शेतकऱ्याचा बुडाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी (ता.11) घडली. सुकलाल लालचंद माळी असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्याचे काम सुरू होते. (Jalgaon News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकलाल माळी (वय 63) हे असोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील आपल्या शेतात बैलजोडी घेऊन जात होते. दरम्यान, रस्त्यात लागणाऱ्या रेल्वेच्या बोगद्याखाली मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. तरीही त्यांनी बोगद्याच्या खालून बैलगाडी टाकली. परंतु, मध्यभागी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने शेवटी त्यांच्या जीवावर बेतले. खोल पाण्यात बैलगाडी गेल्यानंतर बैल बुडत असल्याचे लक्षात येताच सुकलाल माळी यांनी दोन्ही बैलांचे जोत कापले. त्यामुळे बैल पाण्याच्या बाहेर निघाले. मात्र, स्वतः पोहता येत नसल्याने शेतकरी सुकलाल माळी हे बोगद्याखालील पाण्यात बुडाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला.
घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना असोदा येथील ग्रामस्थांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल केले. परंतु, तिथे गेल्यानंतर त्यांना मृत घोषीत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी रूग्णालय परिसरातच आक्रोश केला. सुकलाल माळी यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच असोदा येथील ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.