रामदेववाडी कार अपघात प्रकरणातील तिन्ही संशयितांच्या अडचणीत मोठी वाढ !
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून कलम 304 कायम ठेवले
जळगाव टुडे । तालुक्यातील रामदेववाडी येथे मातेसह तिची दोन बालके अन्य एका मुलाचा भरधाव कारने चिरडल्याने हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तिन्ही संशयितांच्या अडचणीत आता चांगलीच वाढ झाली आहे. कारण, न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला असून विरोधात लावलेले सदोष मणुष्यवधाचे 304 कलम योग्य असल्याचा निर्वाळा देखील दिला आहे. (Jalgaon News)
रामदेववाडी अपघात प्रकरणातील संशयित व जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार हा कसा निर्दोष आहे, हे न्यायालयाला पटवून देण्यासाठी नामांकीत वकिलांची खटपट सुरू असल्याचे दोन दिवसांपूर्वी दिसून आले होते. तसेच सदरच्या खटल्यात अखिलेश हा आरोपीच होऊ शकत नाही, असेही बचावपक्षाच्या वकिलांचे म्हणणे होते. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणात तिन्ही संशयितांच्या विरोधात लावलेले 304 कलम एकदम चुकीचे असून, परिस्थिती घेता प्रत्यक्षात कलम 304 ब लागू केले पाहिजे होते, असा युक्तीवाद बचावपक्षाच्या वकिलांनी केला होता.
प्रत्यक्षात जामीन अर्जावरील सुनावणीवेळी सोमवारी न्यायालयाने तिन्ही संशयितांचे जामीन अर्ज फेटाळून लावले. त्यांच्या विरोधातील 304 कलम योग्य असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. रस्त्याची स्थिती माहिती असतानाही बेदरकारपणे वाहन चालविल्याने चार जणांचा बळी जात असेल तर सदोष मणुष्यवधाचे कलम योग्य ठरते, असे मत देखील न्यायालयाने नोंदवले. विशेष म्हणजे पोलिस पंचनाम्यात कारमध्ये गांजा आढळला आहे आणि अन्य दुसऱ्या कारचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या कारमधील संशयित अद्याप बेपत्ता आहेत. सदरचे संशयित हे बड्या कुटुंबातील असल्याने पुराव्यांची छेडछाड करू शकतात तसेच साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, असेही तिघांचे जामीन फेटाळताना न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे तिन्ही संशयितांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सरकार पक्षातर्फे ऍड.पंढरीनाथ चौधरी व फिर्यादी पक्षातर्फे ऍड.हारूल देवरे यांनी काम पाहिले.