जळगाव जिल्हा बँक चेअरमनच्या मुलाचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी वकिलांची खटपट !

जळगाव टुडे । रामदेववाडीत मातेसह तिचे दोन चिमुरडे आणि अन्य एका मुलाचा बळी घेणाऱ्या कार अपघातातील तिन्ही संशयितांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात कामकाज सुरू झाले आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार यांचा मुलगा अखिलेश पवार हा कसा निर्दोष आहे, हे न्यायालयाला पटवून देण्यासाठी नामांकीत वकिलांची खटपट सुरू असल्याचे दिसून आले आहे. सदरच्या खटल्यात अखिलेश हा आरोपीच होऊ शकत नाही, असेही बचावपक्षाच्या वकिलांचे म्हणणे आहे. (Jalgaon News)

रामदेववाडी अपघात प्रकरणात बचाव पक्षातर्फे वकील ॲड.सागर चित्रे तसेच ॲड.केतन ढाके, ॲड.प्रकाश पाटील, ॲड.अकील इस्माईल हे अटकेतील संशयित तरूणांची बाजू मांडत आहेत. चारही वकिलांनी न्यायालयात केलेल्या युक्तीवादानुसार, पोलिसांनी या प्रकरणात लावलेले 304 कलम एकदम चुकीचे असून, परिस्थिती घेता प्रत्यक्षात कलम 304 ब लागू केले पाहिजे होते.

रामदेववाडीतील अपघातात चार जणांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरलेली कार अर्णव कौल हा चालवित होता तर अखिलेश संजय पवार हा अर्णवच्या शेजारी बसलेला होता. पोलिसांच्या तपासात देखील ते निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे फिर्यादीने कार चालकाच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे अखिलेश पवार हा आरोपी होऊच शकत नाही, असा युक्तिवाद ॲड.सागर चित्रे यांनी केला आहे.

गुन्ह्यातील फिर्यादी हा अपघात प्रकरणाचा प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याचा दावा करून लावलेले सर्व कलम हे जामीनपात्र असल्याचा युक्तीवाद देखील बचावपक्षाच्या वकिलांनी केला आहे. याशिवाय गांजा बाळगल्याचा कोणताच अहवाल प्राप्त झालेला नाही आणि गांजा कोणाजवळ आढळला, ते स्पष्ट होत नाही. गुन्ह्यातील कोणतेच कलम अखिलेश संजय पवार याला लागू होत नाही.अखिलेशची अटकच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद ॲड.सागर चित्रे यांनी केला आहे. अटी व शर्तीवर त्यास जामीन देण्याची विनंती सुद्धा त्यांनी त्यामुळे न्यायालयाकडे केली आहे. दरम्यान, रामदेववाडी अपघात प्रकरणातील संशयितांच्या जामीन अर्जावरील कामकाज सोमवारी (ता.03) पुन्हा होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button