पिंप्री खुर्दच्या शेतकरी महिलांचा कृषी प्रक्रिया उद्योग मार्गदर्शन कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग
जळगाव टुडे । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि नेहरू युवा मंडळ (गडखांब) यांच्या वतीने कृषी आधारित प्रक्रिया उद्योग व शासकीय योजना मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. त्यात पिंप्री खुर्द (ता.धरणगाव) येथील असंख्य शेतकरी महिलांनी सहभाग घेतला. सरपंच कमलबाई धोबी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी होत्या. माजी कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. ( Jalgaon News)
“गाव पातळीवर उद्योग व्यवसाय सुरू करण्याची अनेकांची इच्छा असते, परंतु मार्गदर्शनाअभावी त्यांना व्यवसाय उभारता येत नाही. वास्तविक कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी म्हणून शासनाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही योजना सुरू केली आहे. खान्देशी खाद्य संस्कृतीला विशेष महत्त्व आहे. बिबड्या, लोणचे, कुरडया पापड खाद्यपदार्थांना मोठ्या शहरांमध्ये विशेष मागणी आहे. आपला माल ग्राहाकाकडे पोहचावा, जाहिरातीवर भर द्या. मालाचे प्रमोशन करावे,” असा सल्ला माजी कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिला.
“महिलांना गृह उद्योगाच्या माध्यमातून कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करता येतो. कुठलाही उद्योग एका दिवसात यशस्वी होत नाही. टप्पेनिहाय पाच वर्षांच्या कालावधीत मालाची गुणवत्ता, उत्पादकता यावर उद्योग व्यवसाय वाढीस लागतो. गहू व ज्वारी हे दोन धान्य घेतले तरी यापासून अनेक प्रकारचे पदार्थ तयार होतात. योजनांचा लाभ घेऊन उद्योग सुरु केल्यास गावागावातील रोजगाराचा प्रश्न सुटेल,” असे मत उद्योजक प्रशिक्षक प्रशांत पाटील यांनी मांडले.
विद्यापीठाने शेतकरी सहायता उपक्रमांतर्गत कार्यशाळा आयोजित केलेली आहे. यातून शेतकरी, तरुण व महिलांना निश्चितच मार्गदर्शन मिळेल. एक प्रकारे शिक्षणाची गंगा परिक्षेत्रात पोहोचविली जात आहे, असे नितीन नेरकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. आजीवन अध्ययन विभागाचे संचालक प्रा.डॉ.आशुतोष पाटील, सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनात सदरची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत पिंप्री खु परिसरातील शेतकरी महिलांनी सहभाग नोंदवला होता. यशस्वीतेसाठी उमेद अभियानाचे किरण महाजन, उज्वला बोरसे, शोभा बडगुजर, रोहिणी राजपूत आदींचे सहकार्य लाभले.