जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना हेक्टरी एक लाख रूपयांची नुकसान भरपाई द्या
शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव टुडे । जिल्ह्यातील रावेर, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, भुसावळ, जामनेर तसेच जळगाव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मे महिन्यातील तापमानवाढीचा मोठा बसला होता. त्यात पुन्हा चक्रीवादळ व अवकाळी पावसाने तडाका दिल्याने संबंधित सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने हेक्टरी एक लाख रूपये नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Jalgaon News)
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली असून, घरांवरील पत्रे देखील उडाली आहेत. विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. वीज नसल्याने विहीरी व ट्युबवेल्सचा पाणी उपसा थांबला असून, कडक उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्यात अडचण निर्माण झाली आहे. मुक्या प्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यामुळे शेतीपंपांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावे तसेच तापमान वाढीमुळे व चक्रीवादळाने नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई देण्याची व्यवस्था करावी. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असेही शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी शासकीय केंद्रांवर सुरू करण्याची मागणी अन्य एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पाटील तसेच जळगाव महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, सहकार आघाडी अध्यक्ष वाल्मीक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, इब्राहीम तडवी, सुनील माळी, राजू बाविस्कर, सुहास चौधरी, वाय.एस.महाजन आदींच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर सह्या आहेत.