कानळद्यात विहीरीचे काम करतांना कमरेला बांधलेली दोरी तुटल्याने एकाचा पाण्यात बुडून मृत्यू
जळगाव टुडे । तालुक्यातील कानळदा येथे विहिरीचे काम करतांना सुरक्षितता म्हणून कमरेला बांधलेली दोरी तुटल्याने एका मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोपीचंद पंढरीनाथ बाविस्कर (वय 58) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Jalgaon News)
कानळदा गावातील शेतकरी विश्वास नाना पाटील यांच्या शेतातील विहिरीचे काम सुरू होते, त्याठिकाणी काही मजुरांसोबत गोपीचंद बाविस्कर हे कामाला गेलेले होते. विहिरीचे काम करत असतांना सावधानीचा उपाय म्हणून गोपीचंद बाविस्कर यांच्या कमरेला दोरी देखील बांधण्यात आली होती. मात्र, काम करत असताना अचानक त्यांच्या कमरेला बांधलेली दोरी तुटली आणि ते विहिरीतील पाण्यात जाऊन पडले. मात्र, पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
गोपीचंद बाविस्कर यांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. जळगाव तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून, अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शासकीय रूग्णालयाच्या आवारात बाविस्कर यांच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला होता.