संपूर्ण जळगाव जिल्ह्यात 11 ते 13 मे दरम्यानच्या कालावधीत मद्यविक्री राहणार बंद
जळगाव टुडे । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात 13 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या 48 तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहेत. (Jalgaon News)
जळगाव जिल्ह्यात निवडणूक कालावधीत मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी 48 तासापासून म्हणजेच 11 मे 2024 रोजीच्या सायंकाळी 6 वाजेपासून, मतदानापूर्वीचा एक दिवस म्हणजेच 12 मे 2024 आणि 13 मे 2024 रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत मद्यविक्री बंद राहील. या आदेशाचे बंद कालावधीत उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून येणाऱ्या संबंधित परवानाधारकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात येतील, असेही राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळविले आहे.