पाडळसरे धरण प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट होण्याची चिन्हे
दिल्लीत केंद्रीय जल आयोगाची मंत्री अनिल पाटील यांनी घेतली भेट
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात पाडळसरे येथील निम्न तापी प्रकल्पाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून पुरेशा निधीअभावी रखडले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करणे गरजेचे झाले आहे. त्यांसदर्भात प्रस्ताव केंद्रीय जल आयोगाकडे सादर करण्यात आला असून त्यास येत्या काही दिवसात मान्यता देण्याची ग्वाही केंद्रीय जल आयोगाचे चेअरमन कुशवेंद्र वोहरा यांनी दिली आहे.
पाडळसरे प्रकल्पाला चालना देण्याच्या उद्देशाने राज्याचे मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्लीतील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात जाऊन चेअरमन कुशवेंद्र वोहरा यांची भेट घेतली. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये या धरणाचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. त्या प्रस्तावाच्या मंजुरीबाबत त्यांच्याशी मंत्री श्री. पाटील यांनी सविस्तर चर्चा केली. सदरच्या प्रस्तावास केंद्रीय जल आयोगाची मान्यता लवकरात लवकर प्रदान केली जाईल, असे वोहरा यांनी आश्वासित केले. या बैठकीस केंद्रीय जल आयोगाचे वरिष्ठ अधिकारी व मुख्य अभियंता उपस्थित होते.
दरम्यान, पाडळसे प्रकल्पाबाबत नागपूर येथील वन विभागाच्या कार्यालयाशी सकारात्मक चर्चा सुरु असून वाढीव जागेच्या दर निश्चितीसाठी कृषी विभागाबरोबरही सध्या चर्चा सुरु आहे. त्यातून लवकरात लवकर सकारात्मक मार्ग निघेल, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही स्पष्ट केले.