जळगावहून विमानाने गोवा जाणाऱ्यांची गर्दी, दुसऱ्या दिवशी 182 प्रवाशांनी घेतला लाभ
Jalgaon News : Fly91 ला जळगाव शहर हे पुणे, हैदराबाद आणि गोव्याशी जोडण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत परवाना देण्यात आला आहे. त्यानुसार जळगाव विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यानंतर त्याचा लाभ पहिल्याच दिवशी सुमारे 162 प्रवाशांनी घेतला होता. दुसऱ्या दिवशीही तब्बल 182 प्रवाशी गोव्यासह हैदराबादकडे रवाना झाले. आठवड्यातून तीन दिवस गुरुवारी, शनिवारी आणि सोमवारी या विमानसेवेचा लाभ प्रवाशांना मिळू शकणार आहे.
प्राप्त माहितीनुसार गोवा येथून निघालेले विमान दुपारी चार वाजता जळगाव येथील विमानतळावर दाखल होते आणि साडेचार वाजता हैदराबादकडे रवाना होत असते. हैदराबादला साडेसहा वाजता पोहोचलेले विमान अर्ध्या तासाने म्हणजेच सात वाजता जळगावसाठी उड्डाण घेते. रात्री साडेआठ वाजता जळगावला पोहोचलेले विमान पुन्हा रात्री नऊ वाजता गोवाकडे रवाना होते आणि 10.50 वाजता तिथे पोहोचते. आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच गुरूवारी, शनिवारी व सोमवारी प्रवाशांना या विमानसेवेचा लाभ घेता येणार आहे.
नाईट लँडिंगपासून वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या सुविधांच्या माध्यमातून जळगाव विमानतळ हे देशातील नामांकित विमानतळाच्या यादीत समाविष्ठ झाले आहे. दरम्यान, बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर फ्लाय 91 एअर लाईनला डिजीसीएकडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र AOC मिळाल्याने जळगावहून गोवा तसेच हैदराबादशी जोडणारी विमानसेवा देखील सुरू झाली आहे. त्याचा मोठा फायदा गोवा तसेच हैदराबादला ये-जा करणाऱ्या नियमित प्रवासी तसेच उद्योजक व विद्यार्थ्यांना होताना दिसत आहे. याशिवाय भविष्यात पुणे शहराशी जोडली जाणारी विमानसेवा सुरू झाल्यानंतर जळगावच्या प्रवाशांसाठी ती मोठी पर्वणी ठरणार आहे.