रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील पावणेदोन महिन्यातच भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील रावेरचे उद्योजक श्रीराम दयाराम पाटील यांनी 14 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्या गोष्टीला पावणेदोन महिने उलटत नाही तेवढ्यातच त्यांनी पुन्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त आहे. लोकसभेच्या रावेर मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांची सर्व खटपट चालल्याचे बोलले जात आहे.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासमवेत भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला चांगलाच हादरा दिला होता. त्यानंतर जामनेर तालुक्यातील शेंदुर्णीचे रहिवाशी व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय गरूड यांनी भारतीय जनता पक्षाच्या ध्येय, धोरणांवर विश्वास ठेवून जाहीर पक्ष प्रवेश केला होता. दोघांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यानंतर रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांनीही भाजपचा हात हातात धरला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावेरची उमेदवारी मिळण्याच्या आशेवर विशेषतः डॉ.उल्हास पाटील हे त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासाठी आणि श्रीराम पाटील हे दोघे होते. प्रत्यक्षात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्थानिक नेत्यांच्या सूचनेला जास्त महत्व न देता वरूनच उमेदवार फायनल केला. त्यानुसार रावेरमधून एकनाथ खडसेंच्या स्नूषा खासदार रक्षा खडसे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली. रावेरमधून उमेदवारी मिळण्याची आशा बाळगून असलेल्यांचा मोठा भ्रमनिरास त्यामुळे झाला.
दरम्यान, लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज न होता माजी खासदार डॉ.उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनी भवितव्याचा विचार करून भारतीय जनता पार्टीचे काम जोमाने सुरूच ठेवले आहे. मात्र, उद्योजक श्रीराम पाटील यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अवघ्या काही दिवसातच भाजपला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याची तयारी केली. प्राप्त माहितीनुसार उद्योजक श्री. पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश देखील केला आहे. राष्ट्रवादीकडून त्यांना रावेर मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात येणार असून, त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी (ता.09) होणार असल्याचेही बोलले जात आहे.