जळगाव विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात चर्चा
Jalgaon News | खासगी दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज शुक्रवारी (ता.05) जळगाव विमानतळावर काही काळासाठी आगमन झाले होते. दरम्यान, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बंदद्वार चर्चा केली. तत्पूर्वी विमानतळावर प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे रक्षा खडसे आणि स्मिता वाघ हे दोन महायुतीचे उमेदवार उभे आहेत. दोन्ही मतदारसंघातील महायुतीचे संघटन तसेच विरोधी पक्षाचे बळ याबाबतची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात झाली, असे समजते. काही वेळानंतर मुख्यमंत्री शिंदे हे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.