चाळीसगावला मिळणार स्वतंत्र RTO क्रमांक, आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्यानंतर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात नव्याने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, चाळीसगावला स्वतंत्र RTO क्रमांक मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
चाळीसगाव मतदारसंघ हा जळगाव जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा तालुका असून, तो भडगावसह पाचोरा व पारोळा तालुक्यांच्या अगदी जवळ आहे. तसेच चाळीसगाव तालुका हा छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि धुळे जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे. अलिकडे चाळीसगाव शहराचा झपाट्याने विकास होत असून, अनेक नवीन वाहने दरवर्षी नोंदणीकृत होत आहेत. वाहन चालविण्याचा परवाना काढणाऱ्यांची संख्या देखील खूप मोठी आहे. चाळीसगाव शहर व लगतच्या तालुक्यांमध्ये अनेकवेळा वाहन नोंदणीसाठ व वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी कॅम्प घेतले जातात. परंतु, त्यामुळे शासनावर मोठा आर्थिक भार पडतो. नागरिकांची मोठी गैरसोय देखील होते. ही स्थिती लक्षात घेता चाळीसगाव येथे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे, याकडे प्रामुख्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. तसेच चाळीसगाव येथे स्वतंत्र उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आदेशित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही झाली आहे.
नागरिकांचा 200 किलोमीटरचा फेरा वाचणार
जळगाव येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दर्जात वाढ करून त्याचे आता प्रादेशिक परिवहन कार्यालयात रूपांतर करण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण जिल्ह्याचा भार एकाच कार्यालयावर असल्याने नागरिकांना त्याठिकाणी वर्षभर मोठी गैरसोय सहन करावी लागते. विशेषतः चाळीसगाव शहर व परिसरातील नागरिकांना वाहन नोंदणीसह वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी सुमारे 200 किलोमीटर फेरा पडतो. त्यामुळे चाळीसगावला उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु झाल्यास मोठी सोय होणार आहे.