खासदार रक्षा खडसेंचा सवाल….भाजपच्या कोअर कमिटीतील व्हिडीओ व्हायरल झालाच कसा ?
Jalgaon News : भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पक्षाचे प्रदेश पदाधिकारी व जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी उपस्थित असताना, खासदार रक्षा खडसे आणि त्यांच्या मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक वाद सुरू असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याविषयी प्रतिक्रिया देताना रक्षा खडसे यांनी “भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीतील व्हिडीओ बाहेर व्हायरल झालाच कसा,” असा सवाल उपस्थित केला आहे.
तुम्ही एकनाथ खडसे यांचे नाव घेतात पण गिरीश महाजन यांचे नाव घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन फिरतात, यासह इतर बरेच आरोप भाजप कार्यकर्ते रक्षा खडसे यांच्यावर करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. सदरच्या व्हिडीओमध्ये कार्यकर्ते आणि रक्षा खडसे यांच्यात खडाजंगी सुरु असताना गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना पक्षाने जाब विचारावा
“भाजपाच्या कोअर कमिटीत घडलेला प्रकार बाहेर आणण्यासाठी व्हिडीओ व्हायरल करण्यात आणल्याची बातमी माझ्या कानावर आलेली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत भाजप नेते गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, उत्तर महाराष्ट्र प्रभारी रवी अनासपुरे, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता वाघ आदी उपस्थित होते. दरम्यान, बैठकीच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांपैकी कोणीतरी व्हिडीओ व्हायरल केला आहे आणि त्याची तक्रार मी वरिष्ठांकडे केली आहे. सदरची गोष्ट आठ दिवसांपूर्वीची आहे, ज्यात काहीच तथ्य राहिलेले नाही. सगळ्या गोष्टी घडल्यानंतर आमचे नेते गिरीश महाजन यांनी समजविल्याने कार्यकर्त्यांची नाराजी दूर देखील झाली आहे. कार्यकर्त्यांच्या तक्रारी असतात, थोडेफार विषय होतात. एवढा मोठा मतदारसंघ आहे. कोणीतरी माझ्याकडूनही दुखावले गेले असेल. बऱ्याच चुका आमच्याकडून पण होतात. विषय हा आहे पक्षाच्या कोअर कमिटीचा व्हिडीओ बाहेर व्हायरल करणे चुकीचे आहे. कारण, भारतीय जनता पार्टी हा पक्ष शिस्तीचे पालन करणारा पक्ष आहे. पक्ष या सगळ्या गोष्टींची दखल घेईल आणि जो कोणी ज्यांनी विषय बाहेर आणलेला आहे त्यांना त्याचा जाब विचारेल,” असेही खासदार रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया देताना बोलून दाखवले.