ममुराबादला शेतातील दादरचा कडबा अज्ञात माथेफिरूने पेटवून दिल्याने 40 हजारांचे नुकसान

Jalgaon News : शेतकऱ्याने ज्वारीची काढणी झाल्यानंतर कडब्याचा ढीग शेतात रचून ठेवलेला असताना, अज्ञात माथेफिरूने तो पेटवून दिल्याची घटना ममुराबाद (ता.जि.जळगाव) येथे मंगळवारी (ता.19) सायंकाळी उशिरा साधारण साडेसात वाजेच्या सुमारास घडली. चार एकरावरील कडबा आगीत जळून खाक झाल्याने संबंधित शेतकऱ्याचे सुमारे 40 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

तुरखेडा (ता.जळगाव) येथील मूळ रहिवासी असलेले छगन बुधो साळुंखे यांनी ममुराबाद शिवारातील विदगाव रस्त्यालगतचे एक शेत उक्त्याने केल्यानंतर त्यात रब्बी हंगामात दादर ज्वारीचे पीक घेतले होते. पीक परिपक्व झाल्यानंतर दादर ज्वारीची काढणी देखील त्यांनी नुकतीच आटोपली होती. दरम्यान, दादरचा कडबा जमा करून शेतात दोन ठिकाणी त्याचे ढीग त्यांनी रचलेले होते. गोठ्यात स्वतःच्या म्हशी असल्याने कडबा विकण्याऐवजी घरी सवड मिळेल तेव्हा वाहून नेण्याचा विचार त्यांनी केला होता. दुर्दैवाने मंगळवारी सायंकाळनंतर कोणीतरी आजुबाजुला कोणी नसताना त्यांच्या शेतातील कडब्याचे दोन्ही ढीग पेटवून दिले. त्यात संपूर्ण चारा क्षणात जळून खाक झाला.

शेतकऱ्याच्या मुलाने स्वतः सर्वप्रथम पाहिली कडब्याला लागलेली आग
ज्यांच्या कडब्याला आग लागली त्या शेतकऱ्याचा मुलगा संदिप हा ममुराबाद येथील वीटभट्टीवर ट्रॅक्टर ड्रायव्हरचे काम करतो. मंगळवारी सायंकाळी विदगावहून ममुराबादकडे मातीचे ट्रॅक्टर घेऊन जात असताना, आपल्या शेतातील कडब्याला कोणीतरी आग लावल्याचे त्याच्याच लक्षात आले. त्याने क्षणाचाही विलंब न करता तुरखेडा येथील घरी असलेल्या वडिलांना फोनवरून आगीची माहिती दिली. त्यानंतर छगन साळुंखे व अन्य ग्रामस्थ लगेच घटनास्थळी धाऊन आले. मात्र, तोपर्यंत सर्व काही संपले होते. कोरडा कडबा बेचिराख झाला होता. घडलेला प्रकार व झालेले नुकसान पाहुन शेतकरी छगन साळुंखे व त्यांच्या कुटुंबाने डोक्यालाच हात लावला. याप्रकरणी दोषींना शोधून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button