जळगावमध्ये मुतखड्यावर विना वेदना उपचार करण्यासाठी उपलब्ध झाली ‘ही’ सुविधा
पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, गोरगरिबांचे पैसे वाचणार
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील मुतखड्याने त्रस्त रूग्णांच्या सोयीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात अद्ययावत मशिन उपलब्ध झाले आहे. त्याद्वारे अवघ्या काही सेंकदात मुतखडा फोडला जाऊन तो लघवीवाटे विना अडथळा बाहेर पडेल. फक्त एक पॅरासिटॉमॉल गोळी खाऊन रुग्ण घरी जाऊ शकेल, असा दावा तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आहे. विशेष म्हणजे मुतखड्याच्या ऑपरेशनसाठी गोरगरीबांना पैसे मोजावे लागणार नाहीत.
जिल्हा नियोजन निधीतून मुतखडयासाठी नव्या पिढीतील तंत्रज्ञान असलेली ‘स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी’ ही अद्ययावत मशिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मिळाली आहे. अशी अद्यावत मशीन उत्तर महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही ती जळगावमध्ये बसविण्यात आली आहे. मुतखडा फोडताना कोणतीही वेदना होणार नाही अशी सोय जळगावमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्याचे आपल्याला समाधान असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखविली. जिल्हा वार्षिक योजना निधी अंतर्गत मंजूर झालेल्या ‘ई. एस.डब्लु. एल. सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी सदरची प्रतिक्रिया दिली.
यावेळी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, अरविंद देशमुख तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या नव्या यंत्राद्वारे होणारी एक विना-शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे, जी मूत्रमार्गाच्या काही भागांमध्ये मुतखडे फोडण्यासाठी शॉकवेव्ह वापरते. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी हा किडनी स्टोनसाठी एक सामान्य उपचार आहे. कधीकधी या प्रक्रियेला स्पार्क एक्स्ट्राकॉर्पोरियअल शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी (Spark EM ESWL) म्हणतात. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी मुतखडे फोडण्यासाठी उच्च-उर्जा शॉक (उच्चदाब) लहरी वापरते. किडनी स्टोनचे छोटे तुकडे नंतर मूत्रमार्गात अधिक सहजतेने जाऊ शकतात. शॉकवेव्ह लिथोट्रिप्सी रुग्णाची वेदना कमी करण्यात मदत करु शकते. मूत्रपिंडातील (किडणी) मुतखडे काढून टाकण्यासाठी अधिक आक्रमक शस्त्रक्रिया टाळण्यात ते मदत करु शकते.