अखेर धानवडच्या शेतकऱ्याला मिळाला न्याय….शेतरस्त्यासाठी 12 वर्षांपासून सुरू होता लढा
Jalgaon News : लघू तलावाच्या पाण्याखाली शेतरस्ता गेल्यानंतर पर्यायी रस्ता मिळावा म्हणून गेल्या 12 वर्षांपासून लढा देणारे धानवड (ता.जि.जळगाव) येथील शेतकरी भीमराव तापीराम पाटील यांनी जळगावमधील लघूपाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बैलजोडीसह आमरण उपोषण सुरू केले होते. त्यामुळे हादरलेल्या पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी अखेर रस्त्याच्या कामास तांत्रिक मान्यता देऊन येत्या चार दिवसात प्रत्यक्ष काम सुरू करण्याची लेखी हमी सुद्धा दिली आहे.
शेतरस्ता पाण्याखाली गेल्यानंतर सन 2022 मध्ये भीमराव पाटील यांनी लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. तेव्हाही तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांशी झालेल्या चर्चेनुसार पर्यायी रस्त्यासाठी उपविभागाकडून सर्वेक्षण करून आपणास मागणीनुसार पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यासाठी उपविभागाचे अभियंता प्रत्यक्ष स्थळी येऊन पाहणी करतील. 15 दिवसात शेतरस्त्याबाबत योग्य तो मार्ग काढतील, असे लेखी आश्वासन तत्कालिन उपविभागीय अभियंत्यांनी दिले होते. प्रत्यक्षात दोन वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही कोणतीच कार्यवाही संबंधित कार्यालयाने घेतली नाही.
त्यामुळे धानवडचे शेतकरी भीमराव पाटील हे पुन्हा एकदा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर 11 मार्चपासून आमरण उपोषणाला बसले होते. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या त्या उपोषणाला पाठींबा देखील दिला होता. त्यामुळे उशिरा का होईना लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स. रा. भोसले यांनी शेतकरी भीमराव पाटील यांच्या मागणीची दखल घेतली असून, मजूर सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतरस्त्याचे काम मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी आहे.