जळगाव जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता नवीन शिक्षक भरतीमुळे उंचावेल- मंत्री गिरीश महाजन
'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' उपक्रमात वेगळा ठसा
Jalgaon News : राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यास देखील मोठ्या प्रमाणात शिक्षक मिळाले आहेत. या कार्यक्रमांतर्गत नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीपत्र देताना मनस्वी आनंद होत असून या शिक्षकांकडून भविष्यात जळगाव जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी येथे केले.
शिक्षक महाभरती अंतर्गत निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीपत्र वाटप तसेच ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत पात्र ठरलेल्या शाळांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम रविवारी (ता.10) जळगाव शहरातील संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी जळगावचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, जळगाव जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रंजना पाटील, दिलीप खोडपे, माजी अभियंता जे.के. चव्हाण, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे उपस्थित होते.
या शाळांचा मान्यवरांच्या हस्ते झाला गौरव
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिल्हास्तरावर दोन गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त झालेल्या शाळांना धनादेश स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात स्थानिक स्वराज्य संस्था गटात जिल्हा परिषद शाळा भोटा (ता. मुक्ताईनगर) प्रथम पुरस्कार तर अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकावर आलेल्या जिल्हा परिषद शाळा जळोद व पिंगळवाडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. इतर व्यवस्थापनाच्या खाजगी शाळा गटातून प्रथम क्रमांक लाडकू बाई विद्यालय भडगाव, तर द्वितीय क्रमांक एस. एस. पाटील विद्यालय चहार्डी तालुका चोपडा तर तृतीय क्रमांक पी.एल.नेमाडे प्राथमिक विद्यालय सावदा, या शाळांना देखील यावेळी धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विभाग वार विशेष कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा मुखेड तालुका चाळीसगाव व पी. के. शिंदे विद्यालय पाचोरा या शाळांना देखील गौरविण्यात आले. यावेळी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक महाभरती अंतर्गत प्राप्त झालेल्या शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले.