पीएम किसान, नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागात ठिय्या
Jalgaon News : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व नमो शेतकरी महासन्मान निधीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून तालुक्यातील शेतकरी कृषी विभागात फेऱ्या मारत आहेत. मात्र, रितसर अर्ज देऊन देखील काहीच उपयोग होत नसल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांनी अखेर गुरूवारी (ता.07) जळगावच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला पाठींबा दर्शविला व शेतकऱ्यांची बाजू कृषी विभागाकडे मांडली. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी श्री. ढगे तसेच जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत हे तातडीने कृषी विभागात दाखल झाले. त्यांच्याच मध्यस्थीने नंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सांगता झाली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भंगाळे, युवा मोर्चा तालुका प्रमुख भाऊसाहेब पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष हर्षल चौधरी, तालुका उपाध्यक्ष मिलिंद चौधरी, सरचिटणीस योगेश पाटील, गिरीश वराडे, शेतकरी किशोर चौधरी आदी उपस्थित होते.
25 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे कृषी विभागाचे लेखी पत्र
जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीएम किसान तसेच नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी भाजपच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन पुकारल्यामुळे हादरलेल्या कृषी विभागाने येत्या 25 मार्चपर्यंत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वस्त केले. तालुका कृषी अधिकारी मिलिंद वाल्हे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर पाटील जळकेकर महाराज यांना त्यासंदर्भात लेखी पत्र देखील दिले. दरम्यान, दिलेल्या मुदतीत पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधीचा प्रश्न न सोडविल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला.