अखेर जळगावला पुणे, हैदराबाद आणि गोव्याशी जोडण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा परवाना
खासदार उन्मेशदादा पाटील यांचा पाठपुरावा
Jalgaon News : खासदार उन्मेशदादा पाटील यांनी ‘डीजीसीए’ चेअरमन विक्रम दत्त आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन जळगाव येथून पुणे तसेच हैदराबाद व गोवासाठी विमानसेवा सुरू करण्याच्या उद्देशाने पाठपुरावा केला होता. अखेर Fly91 ला जळगावला पुणे, हैदराबाद आणि गोव्याशी जोडण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत परवाना देण्यात आला आहे.
भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालय अंतर्गत डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) यांच्याकडून Fly 91 कंपनीला सर्व परवानग्या मिळाल्या असून, डिजीसीएकडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (AOC)देखील बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच फ्लाय 91 कंपनीचे विमान जळगाव विमानतळावरून आकाशात झेपावेल, अशी माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिली.
खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सातत्याने जळगाव विमानतळाच्या विकासासाठी पाठपुरावा केला आहे. नाईट लँडिंग ते वैमानिक प्रशिक्षण केंद्र या सुविधांच्या माध्यमातून जळगाव विमानतळ हे देशातील नामांकित विमानतळाच्या यादीत समाविष्ठ झाले आहे. दरम्यान, बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर फ्लाय 91 एअर लाईनला डिजीसीएकडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र AOC मिळाल्याने जळगावहून पुणे, गोवा तसेच हैदराबादशी जोडणारी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्याचा मोठा फायदा नियमित प्रवासी तसेच उद्योजक व विद्यार्थ्यांना होऊ शकणार आहे.