जळगाव शहरातील नवीन रस्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी, नागरिकांशी संवाद

Jalgaon News : जिल्हा नियोजनच्या माध्यमातून शहरांतील रस्त्यांसाठी दिलेल्या निधीतून पूर्णत्वास आलेल्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञ प्राध्यापकाकडून गुणवत्ता तपासणी देखील करण्यात केली. दरम्यान, रस्ते तयार झालेल्या गल्लीतील लोकांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहायक नियोजन अधिकारी राहुल इधे, महानगरपालिकेचे अभियंता इतर कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रस्त्याची पाहणी करत असताना एका भाजी विक्रेत्याला थांबविले. त्याला नाव, गाव, किती वर्षापासून भाजी विकतो हे विचारून, या ठिकाणी रस्ता झाल्यामुळे तुझ्या जीवनात काय फरक पडला विचारले. त्यावेळी तो म्हणाला की मी “इथे नियमित भाजीचा गाडा घेऊन येतो. पूर्वी गाडा ढकलून थकून जायचो, आता या नवीन गुळगुळीत रस्त्यावर थकवा जाणवत नाही. रात्री शांत झोप लागते.” एक सेवा निवृत्त नागरिक म्हणाले, “पूर्वी रस्त्यावरून मोठी गाडी गेल्यावर पार घरात धुरळा यायचा. आता नवीन रस्ता झाल्यापासून धुळ नाही. त्यामुळे आरोग्यदायी वाटते आहे.” एके ठिकाणी नाल्याच्या बाजुला बरीच जागा सुटलेली होती, तिथे महानगरपालिकेला पेव्हरब्लॉक लावायला सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच जागोजागी रस्त्याच्या नावाचे फलक लावून पांढरे पट्टे मारण्याच्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मोजली रस्त्यांची मजबुती
रस्ता मजबूत झाला आहे की नाही हे मोजण्यासाठी एक यंत्र असते. जिल्हाधिकाऱ्यांनी ते यंत्र हातात घेवून स्वतः त्याची मजबुती किती आहे ती मोजली आणि समाधान व्यक्त केले. चांगले आणि मजबूत रस्ते हे शहराच्या भौतिक सुविधेतील अत्यंत महत्वाचा भाग आहे. ते चांगलेच झाले पाहिजेत म्हणून आपण स्वतः हे रस्ते पाहण्यासाठी आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button