जळगावमध्ये लोकसभेचा उमेदवार बदलण्याची चर्चा, प्रविण दरेकरांचा मोठा खुलासा
Jalgaon News : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरूवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे निरीक्षक आमदार प्रवीण दरेकर आणि राहुल आहेर यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाचा गुरूवारी (ता. 29) आढावा घेतला. यावेळी जळगावमध्ये लोकसभेचा उमेदवार बदलण्याच्या चर्चेवर विशेषत्वाने प्रविण दरेकरांनी प्रसार माध्यमांसमोर मोठा खुलासा केला.
लोकसभेच्या आगामी निवडणुकीत उमेदवार कोण हवा तसेच जागा वाटप आणि पक्ष संघटन, अशा विषयांचा आढावा घेण्यासाठी भाजपचे निरीक्षक आमदार प्रवीण दरेकर आणि राहुल आहेर हे गुरुवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या जिल्हा कार्यालयातील बैठकीत पक्षाच्या लोकप्रतिनिधींसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. “भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेऊन ती पक्ष नेतृत्वाकडे देण्याचे काम आम्ही करीत आहोत. आमच्या दौऱ्यामागे तोच उद्देश आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपची प्रचंड ताकद आहे. चांगल्या प्रकारचे नेटवर्क पूर्वीपासूनच आहे. किंबहुना आज त्यात आणखी वाढ झाली आहे”, असे आमदार श्री. दरेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नमूद केले.
दरम्यान, पत्रकारांनी आमदार प्रवीण दरेकर यांना जळगावमधील लोकसभा उमेदवार बदलाच्या बाहेर सुरू असलेल्या चर्चेविषयी विचारणा केली. तेव्हा आमदार श्री. दरेकर म्हणाले, की “चर्चा तर काहीही असू शकते. शेवटी उमेदवारी देत असताना भारतीय जनता पार्टीची एक प्रोसेस असते. येथे कोणाला वाटले म्हणून उमेदवारी, कोणाला नाही वाटले म्हणून उमेदवारी अशी पद्धत नसते. त्या उमेदवाराचे योग्य ते मूल्यमापन केले जाते तसेच संघटनेचे मत विचारात घेतले जाते. विकासाच्या संदर्भात भूमिका बघितली जाते. लोकांमध्ये काय मत ते पाहिले जाते. आमच्याकडे खूप बारकाईने पाहणारी यंत्रणा आहे. त्या चौकटीत व निकषात बसून उमेदवारी दिली जाते. चर्चा ज्या असतात त्या खऱ्या किती खोट्या किती याचा सगळ्याचा अभ्यास करून निर्णय होत असतो, तो लोकसभा उमेदवार निवडीच्या वेळी होईल.”