Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यात बहिणीसोबत बंधाऱ्यावर गेलेल्या चार लहान भावंडांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू….!
Jalgaon News : चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत चार भावंडांचा केटी वेअरमध्ये बुडून मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, भांडी-कपडे धुण्यासाठी मोठी बहीण बंधाऱ्यावर गेली असता तिच्या पाठीमागे गेलेले चार भावंड केटी वेअरमध्ये पडले. ही बाब लक्षात येताच मोठी बहीण वडिलांना बोलावण्यासाठी शेताकडे धावत गेली. मात्र, तोपर्यंत चारही भावंडांचा पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता.
Jalgaon News: Four younger siblings who went to the embankment with their sister died due to drowning in Chalisgaon taluka!
पिंपरखेड येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत शेतमजूर सुभानिया आर्य यांची चार अपत्ये केटीवेअरमध्ये बुडून मृत्यू पावली. सुभानिया आर्य यांचे कुटुंब वर्षभरापूर्वीच सालदार म्हणून चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे शेतकरी उदय अहिरे यांच्याकडे आले होते. त्यांच्या शेताजवळ असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या केटीवेअर बंधाऱ्यावर रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मुलगी भांडी-कपडे धुण्यासाठी गेली होती. तिच्या मागोमाग तिची लहान भावंडेही बंधाऱ्याकडे गेली. या ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने ही सर्व भावंडे पाण्यात बुडाली. रोशनी आर्य (वय ९), शिवांजली आर्य (वय ६),आर्यन आर्य (वय ५) व आराध्या आर्य (वय ४) अशी मृत बालकांची नावे आहेत.
मृतांत तीन बहिणी आणि एका भावाचा समावेश आहे. चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात चारही बालकांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्यावर मध्य प्रदेशातील मूळ गावी दुगाणी (ता.सेंधवा) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. एकाच कुटुंबातील चार बालकांचा पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.