जळगावहून पुणे, गोवा, हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा
Jalgaon News : भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या उडान 5.0 योजनेअंतर्गत Fly91 विमान कंपनीला जळगाव ते मोपा (गोवा), हैदराबाद (तेलंगणा) आणि पुणे (महाराष्ट्र) यांना जोडण्यासाठी परवाना देण्यात आला आहे. प्रत्यक्षात Fly91 विमान कंपनीच्या पहिल्या विमानाचे गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉटर कॅननच्या सलामीने स्वागत देखील करण्यात आले आहे.
जळगावहून पुणे, हैदराबाद आणि गोव्याला विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव Fly91 विमान कंपनीने सादर केल्यानंतर राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीश महाजन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यांच्याच सुचनेनुसार नंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि सदर विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडली होती. प्रस्तावित विमानसेवा सुरू झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पर्यटन स्थळांपर्यंतची कनेक्टीव्हिटी वाढेल तसेच गुंतवणूक वाढून उद्योग व रोजगार वाढीला चालना मिळेल, असे त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विमान कंपनीच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार उडान 5.0 योजनेअंतर्गत Fly91 विमान कंपनीला जळगाव ते मोपा (गोवा), हैदराबाद (तेलंगणा) आणि पुणे (महाराष्ट्र) यांना जोडण्यासाठी भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून रितसर परवाना देण्यात आला आहे. Fly91 विमान कंपनीच्या पहिल्या विमानाचे गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉटर कॅननच्या सलामीने स्वागत देखील करण्यात आले आहे, अशी माहिती जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने सोशल मीडियावर दिली आहे. त्यासंदर्भात एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यामुळे जळगाव येथून प्रस्तावित असलेल्या सुमारे 21 उड्डाणांचा मार्ग मोकळा झाला असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्याचा खूप मोठा फायदा जिल्ह्यातील नागरिकांना होऊ शकणार आहे.