Jalgaon News : उरण, शिळफाटा अत्याचाराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्या !
जळगावमध्ये शरदचंद्र पवार महिला राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
Jalgaon News : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या असून, राज्य सरकार महिलांना सुरक्षा पुरविण्यास कमी पडत आहे. उरण, शिळफाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे गृह खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. याच्या निषेधार्थ आणि उरण, शिळफाटा अत्याचाराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी शरदचंद्र पवार महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात जळगाव येथे बुधवारी निषेध आंदोलन करण्यात आले.
Jalgaon News : Uran, Shilpata torture case should be tried in fast track court and give death sentence to the accused!
यावेळी शरदचंद्र पवार महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महानगराध्यक्ष मंगला पाटील आदी उपस्थित होत्या. “एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा डंका वाजविला जात असताना दुसरीकडे राज्यात लाडक्या बहिणींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या महिन्यात उरण आणि शिळफाटा येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटना काळिमा फासणाऱ्या आहेत. नराधमांवर कायद्याचा आणि गृह खात्याचा धाक राहिला नसल्याचे दर्शविणाऱ्या आहेत.
नवी मुंबईतील उरण येथील एका २२ वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अनेक वर्षांपासून तिच्या मागावर असलेल्या नराधमाने निर्दयीपणे पिडितेवर अनेक वार करुन तिचे हाल हाल करून तिला मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह छिन्नविछिन्न करून तिच्या शरीराची अक्षरशः विटंबना केल्याचे निदर्शनास आले आहे”, असेही रोहिणी खडसे म्हणाल्या.
गृह खात्याची अब्रू चव्हाट्यावर
दुसऱ्या घटनेत बेलापूर येथिल तीस वर्षीय महिला घरगुती भांडण झाल्याने मानसिक शांतता मिळावी म्हणून शिळफाटा येथील गणेश मंदिरात गेली होती. या दोन्ही घटना अत्यंत अमानवीय आणि निर्दयी आहे या घटनांमुळे राज्याचे गृह खाते निद्रिस्त असल्याचे आणि महिलांची सुरक्षा करण्यास कमी पडत असल्याचे जाणवत असून या घटनांमुळे राज्याच्या गृह खात्याची अब्रु चव्हाट्यावर आली आहे. या दोन्ही घटना क्रुरतेचा कळस गाठणाऱ्या असून, निषेधार्ह आहेत. या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि निद्रिस्त असलेल्या गृह खात्याला खडबडून जागे करण्यासाठी हे आंदोलन असल्याचेही रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केले.
यावेळी वर्षा राजपुत, लिलाताई रायगडे, ममता सोनवणे, माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक महानगराध्यक्ष रिंकु उमाकांत चौधरी, सुनिल माळी, चेतन पवार, संग्राम सूर्यवंशी, हितेश जावळे यांच्यासह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.