Jalgaon News : जळगावमध्ये किस्सा टक्केवारीचा; सुनील महाजन-आमदार राजूमामा भोळे आमनेसामने !
Jalgaon News : विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यानंतर विविध राजकीय पक्ष व त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामाध्यमातून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न देखील होत आहे. त्याचा प्रत्यय जळगाव शहरातही आला असून, शिवसेना ठाकरे गटाच्या माजी उपमहापौराने भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांच्यावर महामार्गाच्या कामात कमिशन घेतल्याचा अतिशय गंभीर आरोप केला आहेत. दुसरीकडे आमदार भोळे यांनीही तातडीची पत्रकार परिषद घेत महाजनांना प्रत्युत्तर दिले आहे.
Jalgaon News : Anecdotal percentage in Jalgaon; Sunil Mahajan- MLA Rajumama Bhole face to face!
भाजप आमदार सुरेश भोळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सुरेश भोळे यांनी आपल्या लाडक्या जावयाला जळगावातील रस्त्यांचे ठेके मिळवून देऊन त्यामधून टक्केवारी घेतली असल्याचा आरोप सुनील महाजन यांनी केला आहे. सुनील महाजन यांनी म्हटले की, “लाडकी बहीण, लाडका भाऊ याप्रमाणे सुरेश भोळे यांनी आपल्या जावयाला रस्त्यांचे ठेके मिळवून दिले. या ठेक्यांच्या बदल्यात त्यांनी मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली आहे.” महाजन यांनी हे देखील नमूद केले की, “सुरेश भोळे यांनी टक्केवारी घेतल्यामुळे रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत, ज्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे.” महाजन यांचे आरोप केवळ याच पुरते मर्यादित नाहीत. त्यांनी म्हटले की, “लाडक्या जावयाचे भले व्हावे आणि स्वतःलाही फायदा मिळावा यासाठी सुरेश भोळे यांनी हे सर्व प्रकार केले आहेत.” या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सुनील महाजनांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा
सुनील महाजन यांनी म्हटले की, “जळगाव शहरातील रस्त्यांसाठी निधी आणल्याचा मोठेपणा दाखवणारे सुरेश भोळे, त्याच निधीतून होणाऱ्या रस्त्यांच्या कामांमध्ये टक्केवारी घेतात, हा कुठला न्याय आहे?” त्यांनी पुढे सांगितले की, “टक्केवारी घेऊन निकृष्ट दर्जाची कामे झाल्यामुळेच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.” महाजन यांनी पावसामुळे उघडकीस आलेल्या रस्त्यांच्या स्थितीवरून सार्वजनिक बांधकाम विभागावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी असेही नमूद केले की, “जळगाव शहरातील नागरिकांना या दुरावस्थेमुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे.”
आमदार राजूमामा भोळेंनी दिले हे प्रत्युत्तर
दरम्यान, जळगावचे माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्या आरोपांना आमदार राजूमामा भोळे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. महापालिकेत सत्ता असताना महाजन यांनी १५ व्या मजल्यावरून काय उद्योग केले आणि किती जणांना त्रास दिला, हे सर्व जनतेला माहिती आहे. गौरव पाटील हे माझे जावई नसून, मावसभावाचे जावई आहेत. तसेच ते आधीपासूनच मक्तेदार आहेत. त्यामुळे सुनील महाजनांकडून चुकीचे आरोप झाले आहेत. महाजन यांना आमदारकीची हौस आहे. त्यामुळे कोणतेही पुरावे न देताच ते बिनबुडाचे आरोप करताय, असेही आमदार भोळे यांनी म्हटले आहे.