Jalgaon News : जळगाव जिल्ह्यास विकास कामांसाठी चालू आर्थिक वर्षात सुमारे ७५६ कोटी रूपयांचा निधी मंजूर !
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात सुमारे ६५७ कोटी रूपयांचा निधी विविध विकास कामांसाठी खर्च झाला असून, चालू आर्थिक वर्षात ७५६ कोटी रूपये एवढा निधी मंजूर झाला आहे. विकास कामांसाठी निधी खर्च करण्यात राज्यात जळगाव जिल्हा आघाडीवर असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. याशिवाय जिल्ह्यातील ज्या गावातील जवान शहीद झाले आहेत, त्या गावात शहीद स्मारक उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला असून लवकरच त्याबाबतचे नियोजन केले जाणार आहे.
Jalgaon News : Jalgaon district has been sanctioned a fund of Rs. 756 crores for various development works in the current financial year
जिल्हा नियोजन समितीच्या नुतन सभागृहात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.शिरीष चौधरी, आ.चंद्रकांत पाटील, आ.किशोर पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ.सुरेश भोळे, आ.लता सोनावणे, सर्व अशासकीय सदस्य, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकीत, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती वेवोतोलु केजो, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना सन २०२३/२४ खर्च
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३/२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. ५१० कोटी नियतव्यय मंजुर होता व त्यानुषंगाने संपुर्ण निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला होता. प्राप्त निधीमधून दिनांक ३१ मार्च २०२४ अखेर रु.५१० कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला असून, संपुर्ण वितरीत निधी खर्च झालेला आहे. किरकोळ रु. ४ हजार रूपये इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर तांत्रिक कारणास्तव पुनर्विनियोजन करता येत नसल्याकारणाने शासन स्तरावर समर्पित करण्यात आलेला आहे.
अनुसुचित जाती उपयोजना
जिल्हा वार्षिक योजना (अनुसुचित जाती उपयोजना) सन २०२३/२ अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु.९२ कोटी नियतव्यय मंजुर होता व त्यानुषंगाने दिनांक ३१ मार्च २०२४ अखेर रु. ९२ कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला असून संपुर्ण वितरीत निधी खर्च झालेला आहे.
आदिवासी घटक कार्यक्रम
जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन २०२३/२४ अंतर्गत जळगाव जिल्ह्यासाठी एकूण रु. ५५.९२ कोटी नियतव्यय मंजुर होता व त्यानुषंगाने संपूर्ण निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेला होता. प्राप्त निधीमधून दिनांक ३१ मार्च, २०२४ अखेर रु. ५५.९२ कोटी निधी कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आलेला असून संपुर्ण वितरीत निधी खर्च झालेला आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), जिल्हा वार्षिक योजना (अनुसुचित जाती उपयोजना) व जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी उपयोजना) अंतर्गत सन २०२३/२४ करिता खर्चाची टक्केवारी ही १०० टक्के इतकी आहे.