Jalgaon News : राष्ट्रवादीचा पोळा फुटला; जळगाव ग्रामीण मतदारासंघासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकरांची उमेदवारी फायनल !

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आढावा

Jalgaon News : विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आढावा घेतल्यानंतर जळगाव ग्रामीणमधून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी फायनल करण्यात आली. याशिवाय पारोळा-एरंडोलमधून माजी मंत्री डॉ.सतीश पाटील आणि मुक्ताईनगरातून रोहिणी खडसे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली.

Jalgaon News : Former Minister Gulabrao Deokar’s candidature final in Jalgaon Rural Constituency!
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ मतदारसंघांचा आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला. यावेळी कोणाला उमेदवारी दिली पाहिजे, याविषयी त्यांनी पदाधिकाऱ्यांची मते देखील जाणून घेतली. इच्छुक असलेल्या उमेदवारांचेही म्हणणे ऐकून घेतले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ जागा लढण्याची तयारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शवली. मात्र, आपल्याला विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढायची असल्याने, मित्र पक्षांनाही काही जागा सोडाव्या लागतील. त्यांना सोबत घेऊनच एकदिलाने काम करावे लागेल, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

देवकर, डॉ.पाटलांच्या उमेदवारीवर एकमत
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यायला पाहिजे, याविषयी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. तेव्हा जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर, एरंडोल-पारोळा मतदारसंघातून डॉ.सतीश पाटील यांच्या नावावर सर्वांचे एकमत झाले. दरम्यान, रोहिणी खडसे आणि विनोद तराळ यांनी मुक्ताईनगरसाठी इच्छा व्यक्त केली. मात्र, तराळ यांना यावेळी थांबण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिल्या व रोहिणी खडसे यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

उर्वरित मतदारसंघांसाठी यांचीही आहे तयारी
जळगाव शहरासाठी विकास पवार, मंगला पाटील आणि अशोक लाडवंजारी यांनी उमेदवारीची अपेक्षा केली. अमळनेरसाठी माजी आमदार साहेबराव पाटील, डॉ.बी.एस.पाटील, तिलोत्तमा व गिरीश निकम यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली. चाळीसगाव मतदारसंघासाठी माजी आमदार राजीव देशमुख यांनी आपली तयारी असल्याचे सांगितले. पदाधिकाऱ्यांनीही चाळीसगावची जागा आपणच लढवावी. ती कोणत्याही परिस्थितीत उद्धव सेनेला देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका मांडली. जामनेरच्या जागेसाठी डी.के.पाटील आणि प्रशांत पाटील यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली. चोपड्यातून डॉ.चंद्रकांत बारेला आणि ज्योती पावरा तसेच डी.पी.साळुंखे यांनी इच्छा व्यक्त केली. पाचोऱ्यासाठी आपले भाऊ माजी आमदार दिलीप वाघ यांना उमेदवार देण्याची मागणी त्यांचे बंधू संजय वाघ यांनी केली. भुसावळसाठी स्वाती भामरे आणि रावेरसाठी माजी आमदार अरूण पाटील यांनी उमेदवारीची अपेक्षा केली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button