Jalgaon News : अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील पुन्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर !

वर्षभरापासून होते पक्षापासून चार हात लांब

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यावर अजित पवार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष अस्तित्वात आल्यानंतर सर्व वेगवान घडामोडीत अनेक नेते व पदाधिकारी वैयक्तिक शरद पवारांपासून दुरावले होते. त्यापैकीच एक असलेले अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे देखील गेल्या वर्षभरापासून शरद पवारांपासून चार हात लांबच होते. मात्र, आज अचानक त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाल्याला हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा जोरदार धक्का दिला.

Jalgaon News : Amalner former MLA Krishibhushan Sahebrao Patil again on the platform of SharadChandra Pawar NCP!
जळगाव शहरात आज रविवारी (ता.२१) शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्याच ठिकाणी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अनपेक्षित हजेरी लावत सर्वांना आश्चर्यचकीत केले. पक्षात पुन्हा सक्रीय झाल्याबद्दल माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी साहेबराव पाटलांचे जाहीर स्वागत देखील केले तसेच तापी नदीवरील पाडळसरे प्रकल्पासाठी पहिल्यांदा कोणी निधी जास्त आणून दाखवला असेल तर तो साहेबराव पाटील यांनीच, असेही विधान डॉ. सतीश पाटील यांनी केले.

“सतीश अण्णा म्हणतात की, साहेबराव दादा आपल्याकडे पुन्हा परत आले. मात्र, अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील हे आपल्यातलेच आहेत. अमळनेरची विधानसभा निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद ते पणाला लावतील. तुम्ही काही चिंता करू नका. त्यांची आणि माझी मैत्री फार वर्षांची आहे, साहेबराव पाटील नक्की योग्य ते काम करतील. आपल्या पक्षाच्या मेळाव्याला ते आले आणि आज त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो,” असे उद्गार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढले.

अजित पवार गटाला जोरदार झटका…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील हे अजित पवारांसोबत जातात की शरद पवारांसोबत, असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्याबद्दल प्रसार माध्यमांनी माजी आमदार पाटील यांना विचारणा देखील केली होती. मात्र, राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने व्यथित झाल्यानंतर आपण यापुढे तटस्थ राहुन फक्त विकासाला पाठींबा देणार असल्याची भूमिका पाटील यांनी जाहीर केली होती. त्यावेळी अजित पवार गटाकडून मंत्रिपद मिळालेले अमळनेरचे आमदार अनिल पाटील हे पाडळसरे प्रकल्पासाठी मोठा निधी आणतील, अशी आशा त्यांना होती. प्रत्यक्षात वर्षभरातच साहेबराव पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा साथ देण्याच्या दृष्टीने पुन्हा यू टर्न घेतला आहे. अर्थातच, साहेबराव पाटलांनी शरद पवार गटासोबत पुन्हा हात मिळवणी करून अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकीपूर्वी अमळनेरमध्ये जोरदार झटका दिल्याचे बोलले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button