Jalgaon News : भाजप, शिंदेसेनेची महायुती सत्तेवर येण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते !
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे मोठे विधान
Jalgaon News : लोकसभेत ३१ जागांवर पराभव पत्करावा लागल्यानंतर भेदरलेल्या महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीत काहीही करून सत्ता मिळविण्याचे प्रयत्न आता सुरू केले आहेत. लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना केवळ लाडक्या खुर्चीसाठी आणल्या जात आहेत. तसेच हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावण्यासाठी विशाळगडावरील अतिक्रमाचे प्रकरण उकरण्यात आले आहे. भाजपसह शिंदेसेना व त्यांचे मित्रपक्ष सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असे मोठे विधान शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले.
Jalgaon News : The grand alliance of BJP, Shindesena can go to any level to come to power!
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी व मतदारसंघनिहाय आढावा घेण्यासाठी जळगावमध्ये आज रविवारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीच्या सरकारवर जोरदार टीका केली. व्यासपीठावर माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रदेश निरीक्षक शेखर माने, जिल्हा निरीक्षक प्रसेनजीत पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सतिश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार दिलीप पाटील, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडितराव कांबळे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार राजीव देशमुख, प्रदेश चिटणीस एजाजभाई मलिक, जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील आदी उपस्थित होते.
प्रत्येकाला जगण्याचा अधिकार देणारे सरकार आपल्याला आणायचे आहे…
विशाळगडावर हिंदू आणि मुस्लीम दोघांची अतिक्रमणे आहेत. भर पावसाळ्यात तेथील मुस्लिमांना लक्ष्य करून त्यांच्या वस्तीवर आक्रमण करण्याचा निंदनीय प्रकार नुकताच घडला. त्याचा आम्ही निषेध देखील केला आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशीही मागणी राष्ट्रवादीतर्फे करण्यात आली आहे. राज्यातील हिंदू आणि मुस्लिमांमध्ये असलेला जातीय सलोखा कायम राहिला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. त्यामुळे या राज्यात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार देणारे सरकार आपल्याला आणायचे आहे. लोकसभेत पैशांचा महापूर वाहत होता. विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला ती वाईट प्रथा मोडून काढायची आहे. त्याकरीता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मते देऊन विजयी करा, असेही आवाहन शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवातून धडा घ्या, गाफील राहू नका…
लोकसभेच्या निवडणुकीत चांगला उमेदवार देऊनही राष्ट्रवादीला रावेरमध्ये पराभव पत्करावा लागला. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे उमेदवार श्रीराम पाटील यांनी खचून न जाता पक्षाचे काम यापुढेही जोमाने सुरू ठेवावे, असे बोलून लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवातून धडा घ्या, गाफील राहू नका, असा कानमंत्र जयंत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. लोकसभेच्या निवडणुकीनंतर भेदरलेले महायुतीचे सरकार राज्याच्या तिजोरीत किती पैसा आहे, याचा विचार न करता विविध लाभाच्या योजनांची घोषणा करत आहे. राज्यावर सुमारे ७ लाख ८० हजार कोटींच्या कर्जाचा आधीच बोझा असताना आता आणखी एक लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे कर्ज काढण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य आधी पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, आज दहाव्या-बाराव्या क्रमांकावर गेले आहे. राज्यातील बेरोजगारीचा टक्का आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शेतीमालास भाव नाही, पिकविम्याची भरपाई वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत, असे सुद्धा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हटले.
याप्रसंगी माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच डॉ.सतीश पाटील, अरूण गुजराथी, रोहिणी खडसे, प्रसेनजीत पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.