Jalgaon News : जळगावच्या शासकीय रूग्णालयात 15 कोटींचे अत्याधुनिक सिटी स्कॅन मशिन उपलब्ध होणार
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली घोषणा
Jalgaon News : जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आधुनिकरणासाठी ५० कोटींपेक्षा जास्त निधी जिल्हा नियोजनमधून मंजूर करण्यात आला होता. आता जिल्ह्यातील रुग्णांसाठी १५ कोटींचे अत्याधुनिक सिटी स्कॅन मशिन लवकरच उपलब्ध होणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज केली. त्यांच्या हस्ते सोमवारी (ता.१५) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासाठी नवे मोड्युलर आयसीयू आणि मोड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण करण्यात आले.
Jalgaon News : ct scan machine worth 15 crores will be available in Jalgaon government hospital
यावेळी जळगावच्या खासदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकीत, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, विविध विद्या शाखांचे प्रमुख डॉक्टर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या मॉड्युलर आयसीयुमध्ये स्वयंचलित १४ रुग्ण खाटा उपलब्ध असून, रुग्णांच्या स्थितीबद्दल सतत माहिती देणारे १४ मल्टिपॅरामॉनिटर देखील आहेत. हे सर्व मॉनिटर नर्सिंग स्टेशनच्या संगणक प्रणालीस वायरलेस पध्दतीने जोडण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची शारीरिक स्थितीबाबतची माहिती सतत अद्यावत होत असते. त्यानुसार संबंधित रुग्णांवर उपचार करण्यात येतात. याकरीता २.९४ कोटी रुपये जिल्हा नियोजनमधून मंजूर करण्यात आले होते. तसेच रुग्णालयातील कान, नाक व घसा शास्त्र विभाग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग, बधिरीकरणशास्त्र विभाग तसेच जीवरसायनशास्त्र विभाग या विभागांतील आवश्यक असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचे सुध्दा आज लोकार्पण करण्यात आले.
कॉकलर इंप्लांट सर्जरी पण होणार
कार्ल झेसिस (Karl Zeiss ) या जर्मनस्थित आंतरराष्ट्रीय कंपनीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त सर्वोत्तम प्रतीचा एक्सटेरो हा ऑपेरेटिंग मायक्रोस्कोप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे बसविण्यात आलेला आहे. कानाच्या पडद्याला छिद्र असणे किंवा कानातील हाड सडले असल्यास त्याचा रुग्णाच्या जिवीतास धोका निर्माण होतो. तो दूर करण्यासाठी या ऑपेरेटिंग मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आवश्यक ती शस्त्रक्रिया करण्यात येऊन रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी मदत होईल. ज्या मुलांना जन्मतः ऐकु येत नाही व त्यांना बोलताही येत नाही, अशा मुलांना दिव्यांग म्हणून पुढील आयुष्य जगावे लागते. यावर कॉकलर रोपण ( Cochlear Implant ) ची शस्त्रक्रिया कार्ल झेसिसच्या दुर्बिणीद्वारे करता येणे आता शक्य होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.