जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात सोमवारी (ता. 26) रात्री झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बहुतांश सर्व तालुक्यात गव्हासह ज्वारी, मका, बाजरी, कांदा आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी पाहणी केल्यानंतर लगेचच पीक नुकसानीचे पंचनामे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून सुरु करण्यात आले आहेत.
सोमवारी रात्री पडलेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतात उभी असलेली रब्बी पिके जमिनदोस्त झाली आहेत तसेच कापणी होऊन पडलेली पिके पाण्यात भिजली आहेत. खरिपात कापसाने निराशा केल्यानंतर रब्बी पिकांकडून चांगल्या उत्पादनाची आशा बाळगून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे वादळी पाऊस व गारपिटीने मोठे नुकसान झाले आहे. सदरच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी संबंधित सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेकडून पंचनाम्यांना सुरूवात करण्यात आली आहे. सर्वाधिक नुकसान असलेल्या पारोळा तालुक्यापासून पंचनाम्यांची सुरूवात झाली आहे. नुकसान पातळी लक्षात घेऊन इतर तालुक्यातही पंचनाम्यांना वेग दिला जाणार आहे. प्राथमिक अहवाल तयार झाल्यानंतर तो शासनाकडे मदतीच्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल, अशी माहिती जळगाव येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी ‘जळगाव टुडे’ प्रतिनिधीशी बोलताना दिली.