पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या अज्ञानाची माजी खासदार उन्मेश पाटलांनी उडवली खिल्ली !

गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांचे प्रकरण

जळगाव टुडे । जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तापी नदीवरील पाडळसरे निम्न प्रकल्पासह महाकाय पुनर्भरण प्रकल्प व गिरणा नदीवर प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांचे निवेदन केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना नुकतेच दिले. केंद्र सरकारने सहा महिन्यांपूर्वीच ज्या बलून बंधाऱ्यांना मान्यता दिली आहे, त्या गिरणा नदीवरील बंधाऱ्यांसाठी पालकमंत्री पुन्हा दिल्लीत जाऊन निवेदन देतात. पालकमंत्र्यांचे अज्ञान त्यावरून उघड होते, अशी जोरदार टीका माजी खासदार उन्मेश पाटील यांनी येथे केली. ( Jalgaon News )

महाविकास आघाडीतर्फे जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुधासह, कापूस, केळी आणि ज्वारीच्या प्रश्नावरून गेल्या तीन दिवसांपूर्वी धरणे आंदोलन सुरू होते. त्याठिकाणी शुक्रवारी (ता.१२) दुपारी माजी खासदार श्री.पाटील यांनी महायुतीच्या जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांवर निशाणा साधला. गिरणा नदीवर प्रस्तावित असलेल्या सात बलून बंधाऱ्यांना केंद्र सरकारकडून मंजुरी मिळालेली असली तरी राज्याच्या मंत्रिमंडळाने अद्याप मान्यता दिलेली नाही. हीच बाब नेमकी मंत्री गुलाबराव पाटील यांना माहिती नाही, त्यामुळेच त्यांनी दिल्लीत जाऊन बलून बंधाऱ्यांचे निवेदन दिले. मंत्री पाटील यांनी ठरवले तर ते कॅबिनेटच्या बैठकीत बलून बंधाऱ्यांना तातडीने मान्यता घेऊ शकतात. मात्र, त्यांना विषयच समजलेला नसल्याची टीका देखील माजी खासदार पाटील यांनी केली. ( Jalgaon News )

दरम्यान, ज्या शेती प्रश्नांवर महाविकास आघाडीने धरणे आंदोलन केले, त्यांच्या सोडवणुकीसाठी जिल्हा प्रशासनासह कृषी विभाग, मार्केटिंग फेडरेशन व पशुसंवर्धन विभागाने चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. विशेषतः केळी पीकविम्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी येत्या १० दिवसांत जळगावचे जिल्हाधिकारी, राज्याचे कृषी आयुक्त तसेच कृषी सचिव यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याची ग्वाही कृषी विभागाने दिली. तत्पूर्वी, आंदोलनाच्या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे प्रति विधानसभेचा नाट्यमय अंक सादर करण्यात आला. त्यात महायुतीच्या मंत्र्यांसह आमदारांचे संकट महाजन, सोंगाड्या पाटील, चोरमन चव्हाण असे नामकरण करण्यात आले.

यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, लकी टेलर, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वाल्मीक पाटील, प्रमोद पाटील, जयराज चव्हाण, लक्ष्मण पाटील, सोपान पाटील, अशोक लाडवंजारी, शिवराम पाटील आदींसह महाविकास आघाडी व शेतकरी संघटनेचे बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button