जळगावमध्ये नाल्यात वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह २० तासांनी सापडला…!

जळगाव टुडे । मित्रांसोबत खेळत असताना नाल्यात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेला सहा वर्षीय मुलगा पाण्यात वाहुन गेल्याची खळबळजनक घटना जळगाव शहरातील खंडेरावनगर-हरिविठ्ठलनगर भागात घडली होती. पट्टीच्या पोहणाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो कुठेच आढळून आलेला नव्हता. मात्र, रविवारी दुपारी त्याचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गावरील पोदार शाळेजवळील नाल्यात सापडला. ( Jalgaon News )

Jalgaon News
सचिन राहूल पवार आणि त्याची मोठी बहीण हे शनिवारी (ता.०६) दुपारी चारच्या सुमारास लिंबू तोडण्यासाठी गेले होते. दरम्यान, परिसरातील इतर मुलांसोबत ते तिथेच चेंडू खेळायला लागले. खेळताना चेंडू अचानक नजीकच्या नाल्यात जाऊन पडला आणि तो काढण्यासाठी सचिन हा नाल्यात उतरला. दुर्दैवाने नेमका त्याचवेळी पावसाच्या पाण्यामुळे नाल्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने सचिन त्यात वाहून गेला. प्रसंगी त्याच्यासोबतची बहीण तसेच अन्य लहान मुलांनी आरडाओरड देखील केली. त्यामुळे आजुबाजुच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सचिनच्या आई-वडिलांनाही घडला प्रकार माहिती पडल्याने ते सुद्धा पळतच आले. परंतु, भरपूर शोधाशोध करूनही सचिन नाल्याच्या पाण्यात जवळपास कुठेच सापडला नाही. रविवारी दिवस उजाडल्यावर अग्निशमन दलासह पोलिसांकडून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. अखेर जळगाव-धुळे महामार्गालगतच्या पोदार शाळेजवळ नाल्याच्या गाळात त्याचा मृतदेह आढळून आला. पोटच्या मुलाचा मृतदेह पाहुन त्याच्या माता-पित्याने एकच आक्रोश केला. परिसरातील नागरिकांनी देखील सचिनच्या या अशा मृत्युबद्दल हळहळ व्यक्त केली.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button