जळगावमध्ये घडलेली घटना…नाल्यात चेंडू काढायला गेलेला मुलगा वाहून गेला !
जळगाव टुडे । मित्रांसोबत खेळत असताना नाल्यात पडलेला चेंडू काढण्यासाठी गेलेला सहा वर्षीय मुलगा पाण्यात वाहुन गेल्याची खळबळजनक घटना जळगाव शहरातील हरिविठ्ठलनगर भागात घडली आहे. पट्टीच्या पोहणाऱ्यांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी शनिवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन तो कुठेच आढळून आलेला नाही. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांसह आप्तेष्टांचा जीव टांगणीला लागलेला आहे. सचिन राहुल पवार असे त्याचे नाव आहे. ( Jalgaon News )
प्राप्त माहितीनुसार, सचिन पवार आणि त्याची मोठी बहीण हे शनिवारी (ता.०६) दुपारी चारच्या सुमारास लिंबू तोडण्यासाठी गेले होते. दरम्यान, परिसरातील इतर मुलांसोबत ते तिथेच चेंडू खेळायला लागले. खेळताना चेंडू अचानक नजीकच्या नाल्यात जाऊन पडला आणि तो काढण्यासाठी सचिन हा नाल्यात उतरला. दुर्दैवाने नेमका त्याचवेळी पावसाच्या पाण्यामुळे नाल्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने सचिन त्यात वाहून गेला. प्रसंगी त्याच्यासोबतची बहीण तसेच अन्य लहान मुलांनी आरडाओरड देखील केली. त्यामुळे आजुबाजुच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सचिनच्या आई-वडिलांनाही घडला प्रकार माहिती पडल्याने ते सुद्धा पळतच आले. परंतु, भरपूर शोधाशोध करूनही सचिन नाल्याच्या पाण्यात जवळपास कुठेच सापडला नाही.
जळगाव शहर महानगरपालिकेचे अग्निशमन दल माहिती मिळाल्यानंतर उपस्थित झाले. त्यांनीही नाल्यात सचिनचा बराचवेळ शोध घेतला. मात्र, त्याचा अजिबात पत्ता लागला नाही. रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरूच होते. नाल्यात वाहुन गेलेल्या सचिनचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात, अशी माहिती मिळाली.